हैदराबादच्या मैदानावर बाद फेरीत यजमानांचेच आव्हान संपुष्टात आले. दिल्लीने सामन्यात हैदराबादवर २ गडी राखून मात केली आणि क्वालिफायर-२ मध्ये प्रवेश केला. सलामीवीर पृथ्वी शॉने झळकावलेलं अर्धशतक आणि त्याला मधल्या फळीत ऋषभ पंतने फटकेबाजी करत दिलेली साथ या जोरावर दिल्लीने सामन्यात विजय मिळवला. या सामन्यात दिल्लीकडून शॉचे अर्धशतक झाले, पण सामन्याला कलाटणी ऋषभ पंत खेळीमुळे मिळाली.

ऋषभ पंतने मोक्याच्या वेळी फटकेबाजी केली. त्याने २१ चेंडूत ४९ धावा ठोकल्या. या खेळीत २ चौकार आणि तब्बल ५ षटकारांचा समावेश होता. त्याच्या या खेळीवर अनेकांनी स्तुतीसुमने उधळली. यात त्याचा सहकारी पृथ्वी शॉदेखील मागे राहिला नाही. ऋषभ पंत हा नव्या दमाच्या युवा खेळाडूंमध्ये सर्वोत्तम फिनिशर आहे, असे म्हणत त्याने ऋषभची प्रशंसा केली.

तो म्हणाला की टी २०१ सामन्यांमध्ये खेळताना खेळपट्टीवर स्थिरावण्यासाठी वेळ मिळत नाही. अशा सामन्यांमध्ये खेळताना खूप दडपण असते. आम्ही सामना जिंकावा म्हणून मी मनापासून प्रार्थना करत होतो. ऋषभ पंतने तुफानी खेळी केली. त्याने खरंच उत्तम कामगिरी केली. आम्हा नव्या आणि युवा क्रिकेटपटूमध्ये तो सर्वोत्तम फिनिशर आहे.

ऋषभ पंत जेव्हा खळायला मैदानावर उतरतो, तेव्हा तो सामना आमच्यासाठी खुला होतो. IPL मधील त्याची कामगिरी उल्लेखनीय आहे. त्याने अत्यंत चांगली कामगिरी केली आहे. दुर्दैवाने ऋषभ पंतला सामन्यातील विजयी फटका मारता आला नाही. त्याआधीच तो बाद झाला. पण तसे असले तरी किमो पॉलने ती औपचारिकता पूर्ण केली, असेही त्याने नमूद केले.

दरम्यान, १६३ धावांचा पाठलाग करताना दिल्लीच्या फलंदाजांनी आश्वासक सुरुवात केली. पृथ्वी शॉ आणि शिखर धवन यांनी पहिल्या विकेटसाठी ६६ धावांची भागीदारी केली. अखेरीस दिपक हुडाने धवनला माघारी धाडत दिल्लीची जमलेली जोडी फोडली. यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरही खलिल अहमदच्या गोलंदाजीवर तात्काळ माघारी परतला. दरम्यान पृथ्वी शॉने एक बाजू लावून धरत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. खलिल अहमदने पृथ्वीला माघारी धाडत दिल्लीला आणखी एक धक्का दिला.

यानंतर राशिद खानने एकाच षटकात दोन बळी घेत दिल्लीला बॅकफूटला ढकललं. मात्र यानंतर ऋषभ पंतने धुवाँधार फटकेबाजी करत दिल्लीचं पारडं सामन्यात पुन्हा एकदा जड केलं. अखेरच्या षटकात अमित मिश्रा माघारी परतल्यामुळे सामना रंगतदार अवस्थेत पोहचला होता. मात्र अखेरीस किमो पॉलने विजयासाठी आवश्यक असलेल्या धावा पूर्ण करत दिल्लीने हैदराबादच्या आशांवर पाणी फिरवलं. ऋषभ पंतनेही धावांची खेळी केली. हैदराबादकडून खलिल अहमद, राशिद खानने आणि भुवनेश्वर कुमारने २-२ बळी घेतले. त्यांना दिपक हुडाने १ बळी घेत चांगली साथ दिली.

त्याआधी, दिल्लीच्या गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यामुळे, एलिमिनेटर सामन्यात सनराईजर्स हैदराबाद संघाला १६२ धावांपर्यंत मजल मारता आली आहे. सामन्याच्या पहिल्या षटकापासून अखेरपर्यंत दिल्लीच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करत हैदराबादच्या फलंदाजांना फार मोठे फटके खेळण्याची संधी दिली नाही. हैदराबादकडून सलामीवीर मार्टीन गप्टील, मनिष पांडे, केन विल्यमसन, विजय शंकर यांनी चांगली झुंज दिली.

नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय दिल्लीच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. आक्रमक सुरुवात केलेल्या साहा-गप्टील जोडीला पहिला धक्का दिला तो इशांत शर्माने. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात साहा झेलबाद झाला. यानंतर हैदराबादच्या फलंदाजांनी भागीदारी रचण्याचा प्रयत्न केला, मात्र यामध्ये त्यांना यश आलं नाही. फटकेबाजी करणारा गप्टीलही अमित मिश्राच्या गोलंदाजीवर माघारी परतला.

यानंतर ठराविक अंतराने हैदराबादचे फलंदाज माघारी परतत राहिले. अखेरच्या षटकांमध्ये विजय शंकर आणि मोहम्मद नबी यांनी फटकेबाजी करत हैदराबादला आव्हानात्मक धावसंख्या गाठून दिली. दिल्लीकडून किमो पॉलने ३ बळी घेतले. त्याला इशांत शर्माने २ तर ट्रेंट बोल्ट, अमित मिश्रा यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.

दिल्लीचा पुढचा सामना चेन्नईविरुद्ध रंगणार आहे. या दोन्ही संघांमधला विजेता अंतिम फेरीत मुंबईविरुद्ध खेळेल.