चिन्नास्वामी मैदानावर मुंबई इंडियन्सविरुद्ध सामन्यात, पंच एस. रवी आणि नंदन यांनी दिलेल्या चुकीच्या निर्णयांचा मुद्दा चांगलाच गाजला. १९ व्या षटकात नंदन यांनी बुमराहच्या षटकात चुकीच्या पद्धतीने वाईड बॉलचा निर्णय दिला. तर अखेरच्या षटकात एस.रवी यांचं मलिंगाच्या नो-बॉलकडे लक्ष गेलं नाही. सामना संपल्यानंतर बंगळुरुचा कर्णधार विराट कोहली आणि मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा यांनी या प्रकरणावरुन नाराजी व्यक्त केली. मात्र या प्रकारानंतरही रवी आणि नंदन यांच्यावर कारवाईची शक्यता कमीच आहे.

“सध्याच्या घडीला आमच्याकडे १७ पंच उपलब्ध आहेत. यामधे ११ पंच भारतीय तर ६ पंच हे आयसीसीच्या एलिट पॅनलचे परदेशी पंच आहेत. याव्यतिरीक्त ६ भारतीय पंच हे अतिरीक्त पंच म्हणून काम पाहतायत.” आयपीएलच्या पंच उप-समितीच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला ही माहिती दिली.

अवश्य वाचा – IPL 2019 : तो सावळागोंधळ पंच एस.रवी यांच्यामुळेच !

त्यामुळे ५६ सामन्यांचा भार हा १७ पंचांवर असल्यामुळे बीसीसीआय या प्रकरणी पंच रवी आणि नंदन यांच्यावर कारवाई करण्याची शक्यता कमीच आहे. एस. रवी यांना शेवटच्या चेंडूवर केलेल्या चुकीसाठी नकारात्मक गुण मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचसोबत बाद फेरीच्या सामन्यांमध्ये रवी आणि नंदन यांना संधी नाकारली जाण्याची शक्यता आहे. मात्र सध्याच्या परिस्थीतीमध्ये पंचावर कारवाई होण्याची शक्यता कमीच असल्याची बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयशी बोलताना दिली आहे.