मागच्या दाराने बाद फेरीत प्रवेश करणाऱ्या सनराईजर्स हैदराबाद संघाचा आयपीएलच्या बाराव्या हंगामातला प्रवास अखेर संपुष्टात आलं आहे. विशाखापट्टणमच्या मैदानावर खेळवण्यात येणाऱ्या सामन्यात दिल्लीने हैदराबादवर २ गडी राखून मात केली. सलामीवीर पृथ्वी शॉने झळकावलेलं अर्धशतक आणि त्याला मधल्या फळीत ऋषभ पंतने फटकेबाजी करत दिलेली साथ या जोरावर दिल्लीने सामन्यात विजय मिळवला. दिल्लीचा पुढचा सामना चेन्नईविरुद्ध रंगणार आहे. या दोन्ही संघांमधला विजेता अंतिम फेरीत मुंबईविरुद्ध खेळेल.

१६३ धावांचा पाठलाग करताना दिल्लीच्या फलंदाजांनी आश्वासक सुरुवात केली. पृथ्वी शॉ आणि शिखर धवन यांनी पहिल्या विकेटसाठी ६६ धावांची भागीदारी केली. अखेरीस दिपक हुडाने धवनला माघारी धाडत दिल्लीची जमलेली जोडी फोडली. यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरही खलिल अहमदच्या गोलंदाजीवर तात्काळ माघारी परतला. दरम्यान पृथ्वी शॉने एक बाजू लावून धरत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. खलिल अहमदने पृथ्वीला माघारी धाडत दिल्लीला आणखी एक धक्का दिला.

यानंतर राशिद खानने एकाच षटकात दोन बळी घेत दिल्लीला बॅकफूटला ढकललं. मात्र यानंतर ऋषभ पंतने धुवाँधार फटकेबाजी करत दिल्लीचं पारडं सामन्यात पुन्हा एकदा जड केलं. अखेरच्या षटकात अमित मिश्रा माघारी परतल्यामुळे सामना रंगतदार अवस्थेत पोहचला होता. मात्र अखेरीस किमो पॉलने विजयासाठी आवश्यक असलेल्या धावा पूर्ण करत दिल्लीने हैदराबादच्या आशांवर पाणी फिरवलं. ऋषभ पंतनेही धावांची खेळी केली. हैदराबादकडून खलिल अहमद, राशिद खानने आणि भुवनेश्वर कुमारने २-२ बळी घेतले. त्यांना दिपक हुडाने १ बळी घेत चांगली साथ दिली.

त्याआधी, दिल्लीच्या गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यामुळे, एलिमिनेटर सामन्यात सनराईजर्स हैदराबाद संघाला १६२ धावांपर्यंत मजल मारता आली आहे. सामन्याच्या पहिल्या षटकापासून अखेरपर्यंत दिल्लीच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करत हैदराबादच्या फलंदाजांना फार मोठे फटके खेळण्याची संधी दिली नाही. हैदराबादकडून सलामीवीर मार्टीन गप्टील, मनिष पांडे, केन विल्यमसन, विजय शंकर यांनी चांगली झुंज दिली.

नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय दिल्लीच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. आक्रमक सुरुवात केलेल्या साहा-गप्टील जोडीला पहिला धक्का दिला तो इशांत शर्माने. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात साहा झेलबाद झाला. यानंतर हैदराबादच्या फलंदाजांनी भागीदारी रचण्याचा प्रयत्न केला, मात्र यामध्ये त्यांना यश आलं नाही. फटकेबाजी करणारा गप्टीलही अमित मिश्राच्या गोलंदाजीवर माघारी परतला.

यानंतर ठराविक अंतराने हैदराबादचे फलंदाज माघारी परतत राहिले. अखेरच्या षटकांमध्ये विजय शंकर आणि मोहम्मद नबी यांनी फटकेबाजी करत हैदराबादला आव्हानात्मक धावसंख्या गाठून दिली. दिल्लीकडून किमो पॉलने ३ बळी घेतले. त्याला इशांत शर्माने २ तर ट्रेंट बोल्ट, अमित मिश्रा यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.

Live Blog

23:28 (IST)08 May 2019
अखेरीस विजयासाठीची औपचारिकता दिल्लीच्या किमो पॉलकडून पूर्ण

२ गडी राखून हैदराबादवर मात, दिल्लीचा पुढचा सामना चेन्नईविरुद्ध

हैदराबादचं आव्हान संपुष्टात

23:21 (IST)08 May 2019
अमित मिश्रा माघारी, दिल्लीला आठवा धक्का

Obstructing the Field नियमाअंतर्गत अमित मिश्रा बाद, सामना रंगतदार अवस्थेत

23:10 (IST)08 May 2019
१९ व्या षटकात ऋषभ पंत माघारी, दिल्लीला सातवा धक्का

भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर नबीने घेतला झेल

23:06 (IST)08 May 2019
दिल्लीला सहावा धक्का, रुदरफोर्ड माघारी

भुवनेश्वर कुमारने घेतला बळी

22:46 (IST)08 May 2019
राशिद खानचे एकाच षटकात दिल्लीला दोन धक्के

कॉलिन मुनरो आणि अक्षर पटेलला माघारी धाडण्यात हैदराबादला यश

दिल्लीचा निम्मा संघ माघारी, सामन्यात रंगत

22:29 (IST)08 May 2019
पृथ्वी शॉ माघारी, दिल्लीला तिसरा धक्का

खलिल अहमदने घेतला बळी

22:24 (IST)08 May 2019
कर्णधार श्रेयस अय्यर बाद, दिल्लीला दुसरा धक्का

खलिल अहमदने घेतला बळी

22:14 (IST)08 May 2019
पृथ्वी शॉचं अर्धशतक

हैदराबादच्या गोलंदाजांचा नेटाने सामना करत पृथ्वीचं अर्धशतक

22:08 (IST)08 May 2019
दिल्लीला पहिला धक्का, शिखर धवन माघारी

दिपक हुडाच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळताना धवन यष्टीचीत

22:01 (IST)08 May 2019
दिल्लीच्या सलामीवीरांची दमदार सुरुवात

हैदराबादच्या गोलंदाजीचा नेटाने सामना करत आक्रमक भागीदारी

21:21 (IST)08 May 2019
हैदराबादची १६२ धावांपर्यंत मजल

दिल्लीला विजयासाठी १६३ धावांचं आव्हान

21:18 (IST)08 May 2019
राशिद खान माघारी, हैदराबादचा आठवा गडी तंबूत परतला

किमो पॉलच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक पंतने घेतला झेल

21:17 (IST)08 May 2019
दिपक हुडा माघारी, हैदराबादला सातवा धक्का

चोरटी धाव घेताना हुडा धावबाद

21:14 (IST)08 May 2019
मोहम्मद नबी माघारी, हैदराबादला सहावा धक्का

अखेरच्या षटकात किमो पॉलने घेतला बळी

21:07 (IST)08 May 2019
विजय शंकर माघारी, हैदराबादचा निम्मा संघ बाद

फटकेबाजी करण्याच्या नादात शंकर ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर माघारी

20:54 (IST)08 May 2019
हैदराबादला चौथा धक्का, विल्यमसन माघारी

इशांत शर्माने उडवला विल्यमसनचा त्रिफळा

20:38 (IST)08 May 2019
मनिष पांडे माघारी, हैदराबादला तिसरा धक्का

किमो पॉलने घेतला बळी

20:08 (IST)08 May 2019
फटकेबाजी करणारा मार्टीन गप्टील माघारी, हैदराबादला दुसरा धक्का

अमित मिश्राच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात गप्टील बाद

19:48 (IST)08 May 2019
हैदराबादला पहिला धक्का, साहा माघारी

इशांत शर्माने घेतला बळी

त्याआधी मार्टीन गप्टीलची फटकेबाजी करत आक्रमक सुरुवात

19:08 (IST)08 May 2019
दिल्लीने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

पराभूत संघाचं आयपीएलमधलं भवितव्य आज संपुष्टात येणार

दोन्ही संघांमध्ये एक-एक बदल