२०१९ साली आयपीएलचा बारावा हंगाम भारत आणि संयुक्त अरब अमिराती या दोन देशांमध्ये खेळवला जाण्याची शक्यता आहे. पुढच्या वर्षी भारतात होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांमुळे बीसीसीआय आयपीएलचे काही सामने संयुक्त अरब अमिरातीत खेळवण्याच्या विचारात आहे. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने IANS या वृत्तसंस्थेला माहिती दिली.

पुढच्या वर्षी भारतात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडणार आहेत. त्यामुळे आयपीएलचा अर्धा हंगाम संयुक्त अरब अमिरातीत खेळवला जाण्याची दाट शक्यता आहे. मात्र या बाबतचा अंतिम निर्णय निवडणुकांची तारीख जाहीर झाल्यानंतर घेण्यात येईल, असं बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितलं आहे.

आयपीएल भारताबाहेर जाण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. २००९ साली भारतात होणाऱ्या निवडणुकांमुळे आयपीएलचा संपूर्ण हंगाम दक्षिण आफ्रिकेत खेळवण्यात आला होता. यानंतर २०१४ साली झालेल्या निवडणुकांमुळे स्पर्धेचे पहिले दोन आठवडे संयुक्त अरब अमिरातीत खेळवले गेले होते.