आयपीएलच्या बाराव्या हंगामात आपला पहिला सामना खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स संघाने मुंबई इंडियन्ससमोर 214 धावांचं आव्हान ठेवलं आहे. मधल्या फळीत ऋषभ पंतने केलेल्या आक्रमक फटकेबाजीच्या जोरावर दिल्लीने डोंगराएवढी धावसंख्या उभी केली. मुंबईच्या गोलंदाजांचा समाचार घेताना ऋषभ पंतने 18 चेंडूत अर्धशतक झळकावलं. या खेळीदरम्यान ऋषभ पंतने महेंद्रसिंह धोनीच्या नावावर असलेला अनोखा विक्रम आपल्या नावे जमा केला आहे.

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध सर्वात कमी चेंडूत अर्धशतक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ऋषभ पहिल्या स्थानी गेला आहे. ऋषभने 18 चेंडूत अर्धशतक झळकावलं. 2012 साली चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने 20 चेंडूत अर्धशतक झळकावलं होतं.

ऋषभने मुंबईविरुद्ध 27 चेंडूत 78 धावा तडकावल्या. त्याच्या या खेळीत 7 चौकार आणि 7 षटकारांचा समावेश होता. मुंबईकडून मिचेल मॅक्लेनघनने 3 तर जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, बेन कटींग यांनी प्रत्येकी 1-1 बळी घेतला.