नवी दिल्ली : दोन भूमिका सांभाळणारा भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीविषयी परस्पर हितसंबंध जोपासल्याबद्दल तीन क्रिकेट चाहत्यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) लवाद अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. याविषयी लवाद अधिकाऱ्यांकडून गांगुलीची बाजू ऐकून घेतली जाणार आहे. मात्र दिल्लीच्या सल्लागारपदाबाबत कोणताही अडथळा येणार नसल्याचे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले.

दिल्ली आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यातील सामना १२ एप्रिलला होणार असून त्या वेळी दिल्लीच्या ‘डग-आऊट’मध्ये बसण्यास गांगुलीला कोणतीही अडचण येणार नाही. या प्रकरणासंदर्भात अंतिम निकाल देण्याआधी लवाद अधिकारी डी. के. जैन हे गांगुली यांची पूर्ण भूमिका समजून घेणार आहेत. गांगुलीने त्याच्याकडून केलेल्या खुलाशात या प्रकरणात कोणतेही परस्पर हितसंबंध जोपासले नसल्याचे म्हटले आहे. दरम्यान, हा मुद्दा जैन यांच्यासमोर विचाराधीन असला तरी कोणताही नियम हा गांगुलीला आडकाठी आणू शकत नाही, असे बीसीसीआयच्या सूत्रांनी नमूद केले. गांगुली सध्या बंगाल क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष आणि दिल्ली कॅपिटल्स संघाचा सल्लागार अशा दुहेरी भूमिका सांभाळत आहे.