IPL 2019 SRH vs CSK : हैदराबादच्या मैदानातील IPL सामन्यात चेन्नईच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात CSK चा नियमित कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने विश्रांती घेतली असल्याने अनुभवी सुरेश रैनाकडे संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली. धोनी हा DRS च्या बाबतीत अतिशय अनुभवी मानला जातो. तसेच धोनीला मैदानावर अनेकदा नशिबाची साथ असल्याचे दिसते. पण बुधवारच्या हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात मात्र धोनीच्या अनुपस्थितीत नशीबही CSK वर रुसल्याचा प्रत्यय आला.

चेन्नईच्या संघाला चांगली सुरुवात मिळाली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेणाऱ्या चेन्नईने डावाला धडाकेबाज सुरुवात केली. सलामीवीर वॉटसन आणि डु प्लेसिस यांनी चेन्नईला सातव्या षटकात अर्धशतकी सलामी मिळवून दिली. पण चांगली सुरुवात मिळाल्यानंतर चेन्नईचा सलामीवीर वॉटसन त्रिफळाचीत झाला. ४ चौकारांसह ३१ धावा करून तो माघारी परतला. अर्धशतकाच्या जवळ पोहोचलेला डु प्लेसिसदेखील उसळत्या चेंडूवर झेलबाद झाला. त्याने ३१ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकार खेचत ४५ धावा केल्या.

त्यानंतर धोनीच्या अनुपस्थितीमध्ये कर्णधारपद भुषवणारा सुरेश रैना मैदानावर आला. तो खेळपट्टीवर जम बसवणार इतक्याच तो पायचीत झाला. त्याने १३ चेंडूत १३ धावा केल्या. पाठोपाठ केदार जाधवदेखील पायचीत झाला. त्याला केवळ १ धाव जमवता आली. विशेष म्हणजे या दोनही विकेटच्या वेळी मैदानावरील पंचांनी फलंदाजाला बाद ठरवले. त्यामुळे CSK ने DRS ची मदत घेतली, पण दोनही वेळा रिव्ह्यूमध्ये त्यांना मैदानावरील पंचांचा निर्णय मान्य करावा लागला.

दरम्यान, या सामन्याआधी नाणेफेकीसाठी मैदानावर धोनीऐवजी रैना येणे हा प्रकार पाहून अनेकांना आश्चर्य वाटले. कारण ही बाब फारशी परिचयाची नाही. अशा प्रकारचा अनुभव शेवटचा कधी बरे आला असेल? याबाबत चाहत्यांनीदेखील चर्चा केली असेल. या आधी धोनीने IPL चा सामना खेळला नाही अशी बाब तब्बल ९ वर्षानंतर घडली. २०१० साली धोनीशिवाय CSK चा संघ शेवटचा मैदानावर उतरला होता. मात्र त्यानंतर आजच्या सामन्यापर्यंत धोनी एकही सामन्याला मुकला नव्हता. धोनीने CSK साठी सलग तब्बल १२१ सामने खेळले. त्यांनतर त्याने आज विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला.