भारतीय संघाचा माजी कर्णधार के. श्रीकांतने चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings, CSK) संघाचा कर्णधार एम.एस धोनीला चांगलेच सुनावलं आहे. राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals, RR) विरुद्ध सोमवारी झालेल्या सामन्यात चेन्नईचा सात विकेटने पराभव झाला होता. या पराभवानंतर सीएसकीचं प्ले ऑफचं गणित अवघड झालं आहे. पराभवनंतर धोनीनं युवा खेळाडूंबद्दल केलेलं वक्तव्य श्रीकांत यांना पटलं नाही.

काय म्हणाला होता धोनी –
‘हे खरेय की यावेळी आम्ही युवा खेळाडूंना कमी संधी दिली आहे. पण असेही असू शकते की, युवा खेळाडूंमध्ये आम्हाला ती चमक दिसली नसेल. उर्वरीत काही सामन्यात आम्ही त्यांना संधी देऊ शकतो. तेही कोणत्याही दबावाखाली खेळतील.

श्रीकांत काय म्हणाले –
युवा खेळाडूबद्दल केलेल्या वक्तव्यावर इंडिया टुडेशी बोलताना के. श्रीकांत यानी नाराजी व्यक्त करत धोनीचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले की, ‘धोनीचं वक्तव्य हास्यस्पद आहे. त्याच्या या वक्तव्याशी मी बिलकुल सहमत नाही. तुमचं टीम सिलेक्शन प्रोसस चुकलेय का? तुम्ही म्हणताय युवा खेळाडूंमध्ये ती चमक नाही. जगदीशनने पहिल्याच सामन्यात सन्माजनक कामगिरी केली होती. केदार जाधव आणि पियुष चावला यांच्यामध्ये चमक आहे का? मुळात तुम्ही केलेलं वक्तव्यच चुकीचं आहे. सामन्यानंतर धोनीनं जे तर्क मांडले ते स्वीकारण्याजोगे नाहीत. तो प्रक्रियेची गोष्ट करतोय पण मुळात तुमची संघ निवड प्रक्रियाच चुकीची आहे. युवा जगदीशनने आपल्या पदार्पणाच्या सामन्यातच २८ चेंडूत ३३ धावांची खेळी केली. त्यानं फिरकी गोलंदाजी समर्थपणे खेळून काढली. मग जगदीशनमध्ये चमक नाही तर केदार जाधव आणि पियुष चावलामध्ये आहे का? मुळात तुमच्या प्रोसेसच्या गोंधळात या आयपीएलमधील चेन्नई संघाचा प्रवास संपला आहे, असे श्रीकांत म्हणाले.’