IPL 2021 ला पुढच्या महिन्यात ९ एप्रिल रोजी सुरुवात होणार आहे. त्यासाठी सर्वच संघांनी तयारी सुरु केली आहे. १० मार्चपासून CSK नं चेन्नईमध्ये आपल्या खेळाडूंसाठी ट्रेनिंग कॅम्प सुरू केला आहे. भारताचा माजी कर्णधार आणि तडाखेबाज खेळाडू महेंद्रसिंह धोनी सध्या चेन्नईमधल्या या सराव शिबिरामध्ये सराव करत आहे. गेल्या वर्षी संयुक्त अरब अमिरातीमध्ये झालेला आयपीएलचा मागचा सीजन संपल्यानंतर शुक्रवारी पहिल्यांदा महेंद्रसिंह धोनी मैदानावर उतरला होता. पण पहिल्याच दिवशी माहीनं नेट्समध्ये तुफान फटकेबाजी करून यंदाच्या IPL मधल्या सर्वच संघांच्या गोलंदाजांना इशाराच दिला आहे. सीएसकेनं माहीच्या फटकेबाजीचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

 

आयपीएलच्या मागच्या वर्षीच्या हंगामामध्ये धोनीच्या सीएसकेची कामगिरी निराशाजनक राहिली होती. स्पर्धेच्या शेवटी सातव्या स्थानावर राहिल्यामुळे सीएसके आणि महेंद्र सिंह धोनीवरही चेन्नईचे फॅन्स नाराज झाले होते. यंदा मात्र धोनी पलटन पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाली आहे. यंदाच्या आयपीएलच्या लिलावामध्ये सीएसकेनं मोईन अली, कृष्णप्पा गौतम, चेतेश्वर पुजारा, हरिशंकर रेड्डी, के भगत वर्मा, हरी निशंत यांना खरेदी करून आपली बाजू भक्कम केली आहे. त्यामुळए क्रिकेट चाहत्यांना आयपीएलच्या या हंगामात सीएसकेची कामगिरी कशी असेल, याची उत्सुकता लागली आहे.