भारतात करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे BCCIने IPL 2020चे आयोजन युएईमध्ये केले होते. तो हंगाम संपुष्टात आल्यानंतर लगेचच BCCIने पुढच्या हंगामाची तयारी सुरू केली होती. फेब्रुवारी महिन्यात IPL 2021साठी खेळाडूंचा लिलाव होईल असं स्पष्ट करण्यात आलं होतं. त्यानुसार, १८ फेब्रुवारीला लिलाव प्रक्रिया पार पडेल, अशी अधिकृत घोषणा IPL गव्हर्निंग कौन्सिलने केली. पण स्पर्धा भारतात होणार की भारताबाहेर याबाबत अद्याप स्पष्टता नाही. यावर BCCIच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याने माहिती दिली.

“IPL 2021साठी खेळाडूंचा लिलाव १८ फेब्रुवारीला पार पडणार आहे. या मिनी-ऑक्शननंतर स्पर्धेच्या आयोजनाबाबत निर्णय घेण्यात येईल. BCCIने सध्या सर्व पर्याय खुले ठेवले आहेत. भारतात IPLचे आयोजन करण्यालाच प्राधान्य असेल. पण त्यादृष्टीने इतर सर्व गोष्टींचाही विचार करावा लागेल. युएई हा देखील पर्याय आमच्यासाठी खुला आहे. कारण तेथे कशापद्धतीने आयोजन करायचं याचा आम्हाला चांगला अंदाज आहे. BCCIने सप्टेंबर २०२०मध्ये युएई क्रिकेट बोर्डासोबतच्या सामंजस्य करार आणि यजमानपदाच्या करारावर स्वाक्षरी केलेली आहे”, अशी माहिती टीओआयला BCCIच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिली.

आणखी वाचा- IPL 2021 Auction: ठरलं!! ‘या’ तारखेला होणार खेळाडूंचा लिलाव

“आतापर्यंत संघमालक आणि संघ व्यवस्थापनातील अधिकाऱ्यांनी आयोजनाचे ठिकाण पाहून मगच लिलावात खेळाडूंची निवड केली आहे. पण यंदा अद्याप ठिकाणाचा निर्णय झालेला नाही. भारतासोबतच युएई हादेखील एक उत्तम पर्याय नक्कीच असू शकतो. BCCI आणि संघमालकांची अद्याप या विषयावर चर्चा झालेली नाही”, असेही त्या अधिकाऱ्याने सांगितले.

दरम्यान, फेब्रुवारीच्या १८ तारखेला लिलाव प्रक्रिया पार पडणार असल्याची घोषणा IPLने अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून केली. त्याआधी प्रत्येक संघाने २० जानेवारीला आपल्या संघातील कायम राखलेल्या खेळाडूंची यादी आणि करारमुक्त केलेल्या खेळाडूंची यादी BCCIकडे सुपूर्द केली आहे.