मुंबईवर चार विकेट्सने विजय
प्रत्येक सामना हा नवा असतो, त्यामध्ये गेल्या सामन्याच्या विजयाचा किंवा पराभवाचा विचार करायचा नसतो, तर कामगिरीत सुधारणा करायची असते, हे बोल चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने पुन्हा एकदा खरे करून दाखवले आणि अटीतटीचा सामना शांत चित्ताने कसा जिंकायचा याचाही उत्तम वस्तुपाठ सादर केला. किंग्ज इलेव्हनविरुद्धच्या सामन्यापेक्षा या सामन्यात गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि फलंदाजीमध्ये कमालीची सुधारणा करत चेन्नईने मुंबई इंडियन्सला चार विकेट्सने पराभूत केले. आर. अश्विनची फिरकी, सुरेश रैनाचे जबरदस्त क्षेत्ररक्षण,ड्वेन स्मिथचे अर्धशतक  आणि धोनीच्या शानदार विजयी समाप्तीच्या जोरावर बाजी मारत मुंबईची विजयाची मालिका खंडीत केली. वानखेडेवर मुंबईने गेल्या १० सामन्यांमध्ये विजय मिळवला होता, पण अकरावा सामना त्यांच्यासाठी पराभवाचा ठरला. या पराभवामुळे मुंबईची विजयाची हॅट्ट्रिक हुकली आणि त्यांचे बाद फेरीत पोहोचण्याचे आव्हान अधिक खडतर बनले. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना चेन्नईपुढे १५८ धावांचे आव्हान ठेवले होते आणि त्यांनी ते अखेरच्या षटकामध्ये पूर्ण केले.

मुंबईच्या १५८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईला दमदार फलंदाजी देता आली नाही. ब्रेन्डन मॅक्क्युलमला (१३) संघात आलेल्या प्रवीण कुमारने बाद केल्यावर फलंदाजीला आलेल्या सुरेश रैनाला (१९) पाच धावांवर जीवदान मिळाले, पण त्याचा फायदा रैनाला उचलता आला नाही. ड्वेन स्मिथने दुसरी बाजू लावून धरली. स्मिथने संयमी फलंदाजी करत अर्धशतक झळकावले, पण प्रवीण कुमारला सलग दुसऱ्यांदा षटकार ठोकण्याच्या नादात त्याने विकेट गमावली. स्मिथने ५ चौकार आणि ३ षटकारांच्या जोरावर ५७ धावांची खेळी साकारली, तर फॅफ डय़ू प्लेसिसबरोबर (३१) तिसऱ्या विकेसाठी ६४ धावांची भागीदारी रचली. स्मिथनंतर प्लेसिसही बाद झाल्याने सामना अटीतटीचा झाला. अंतिम षटकामध्ये ११ धावांची गरज असताना धोनीने हे आव्हान लीलया पेलत संघाला विजय मिळवून दिला.
तत्पूर्वी, चेन्नईने नाणेफेक जिंकत मुंबईला फलंदाजीसाठी पाचारण केले आणि त्यांच्या धावसंख्येवर अंकुश ठेवण्यात यश मिळाले. मुंबईची सुरुवात चांगली झाली नसली तरी संघात पहिल्यांदाच आलेल्या लेन्डल सिमोन्स (३८) आणि अंबाती रायुडू यांनी संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून देण्यात मोलाचा वाटा उचलला. रायुडूने २ चौकार ४ षटकार ४३ चेंडूंत ५९ धावा केल्या.

संक्षिप्त धावपलक
मुंबई इंडियन्स : २० षटकांत ६ बाद १५७
(अंबाती रायुडू ५९, लेन्डल सिमोन्स ३८; आर. अश्विन ३/३०) पराभूत वि. चेन्नई सुपर किंग्ज : १९.३ षटकांत ६ बाद १६० (ड्वेन स्मिथ ५७; लसिथ मलिंगा २/१५ ).