कर्णधार गौतम गंभीरने साकारलेल्या ६९ धावांच्या लाजवाब खेळीच्या बळावर कोलाकाता नाइट रायडर्स संघाने दिल्ली डेअरडेव्हिल्स संघावर आठ विकेट राखून शानदार विजयाची नोंद केली. कोलकाताकडून गंभीर आणि रॉबिन उथप्पा (४७) यांनी १०६ धावांची दमदार सलामी रचून संघाच्या विजयाची पायाभरणी केली. त्यामुळे कोलकाताना १८.२ षटकांत १६१ धावांचे लक्ष्य गाठता आले.
मोहम्मद शमीच्या नेतृत्वाखालील दिल्लीच्या वेगवान माऱ्याचा गंभीर आणि उथप्पा यांनी आरामात सामना केला. गंभीरने ५६ चेंडूंत ५ चौकार आणि २ षटकारांसह आली खेळी साकारून सामनावीर पुरस्कार पटकावला, तर उथप्पाने ३४ चेंडूंत ५ चौकार आणि एका षटकारासह ४७ धावा केल्या. उत्तरार्धात मनीष पांडेने नाबाद २३ धावा केल्या. दिल्लीकडून डावखुरा वेगवान गोलंदाज वेन पार्नेल फक्त यशस्वी ठरला. त्याने गंभीर आणि उथप्पा दोघांनाही बाद केले.
त्याआधी, निम्म्या संघाला जेमतेम शतकापर्यंत मजल मारता आल्यानंतर जीन पॉल डय़ुमिनी आणि केदार जाधव यांनी अखेरच्या हाणामारीच्या षटकांमध्ये नाबाद ५५ धावांची भागदारी केली. त्यामुळे दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाला ५ बाद १६० अशी समाधानकारक धावसंख्या करता आली.
डय़ुमिनीने २८ चेंडूंत नाबाद ४० धावा काढताना तीन षटकार ठोकले, तर जाधवने फक्त १५ चेंडूंत तीन चौकार आणि एक षटकारासह नाबाद २६ धावा केल्या.

संक्षिप्त धावफलक
दिल्ली डेअरडेव्हिल्स : २० षटकांत ५ बाद १६० (दिनेश कार्तिक ३६, जे पी डय़ुमिनी नाबाद ४०, केदार जाधव नाबाद २६; शाकिब अल हसन १/१३) पराभूत वि. कोलकाता नाइट रायडर्स : १८.२ षटकांत २ बाद १६१ (रॉबिन उथप्पा ४७, गौतम गंभीर ६९, मनीष पांडे नाबाद २३; वेन पार्नेल २/२१)
सामनावीर : गौतम गंभीर.