इंडियन प्रिमियर लीग म्हणजेच आयपीएलच्या १४ व्या पर्वातील खेळाडूंचा लिलाव नुकताच पार पडला. यामध्ये ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज स्टीव्ह स्मिथला अवघ्या दोन कोटी २० लाख रुपयांना संघात स्थान देण्यात आळं आहे. मात्र यासंदर्भात आता ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कने एक आश्चर्यचकित करणारा दावा केलाय. एवढ्या कमी किंमतीत स्मिथ आयपीएल २०२१ मध्ये खेळणं कठीण असल्याचं क्लार्कने म्हटलं आहे. क्लार्कने स्मिथसारख्या चांगल्या खेळाडूला दिल्ली कॅपिटल्सने एवढ्या कमी किंमतीत विकत घेतल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केल आहे. स्मिथला एवढी कमी किंमत मिळाल्याबद्दल यापूर्वीही अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं असलं तरी एवढ्या कमी किंमतीत तो खेळणार नाही असं वक्तव्य करणारे क्लार्क पहिलाच खेळाडू आहे. क्लार्कने हॅमस्ट्रींगच्या दुखापतीमुळे स्मिथ आयपीएलचं पर्व अर्ध्यातही सोडून जाऊ शकतो असाही अंदाज व्यक्त केलाय.

क्लार्कने बिग स्पोर्ट्स ब्रेकफास्टच्या पॉडकास्टमध्ये स्मिथला मिळालेल्या रक्कमेसंदर्भात भाष्ट केलं. “मला माहितीय की स्मिथची टी-२० मधील कामगिरी फारशी चांगली नाहीय. त्याला नुकत्याच झालेल्या आयपीएलच्या पर्वातही फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. मात्र तरीही त्याला एवढी कमी किंमत मिळाल्याबद्दल मला आश्चर्य वाटत आहे. ही रक्कम चार लाख डॉलर्सहूनही कमी आहे. मागील पर्वामध्ये राजस्थान रॉयल्सचा कर्णधार म्हणून स्मिथला जेवढे पैसे देण्यात आले होते ते पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. त्यामुळे भारतात येण्याआधी त्याला हॅमस्ट्रींगची दुखापत झाली आणि त्याने दौऱ्यावर न जाण्याचा निर्णय घेतला तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही,” असा सूचक इशारा क्लार्कने दिलाय. आयपीएल आठ आठवडे चालणार आणि तयारी वगैरे सर्वांचा विचार करता हा कालावधी ११ आठवड्यांचा होणार. त्यामुळे मला नाही वाटत की केवळ २.२ कोटींसाठी तो आपल्या पत्नीपासून ११ आठवडे दूर राहील. या पर्वाआधी मागील पर्वात स्मिथला आयपीएलच्या प्रत्येक सीझनमध्ये साडेबारा कोटी रुपये मिळाले आहेत.

२०२० चा आयपीएलचा हंगाम स्मिथला फारसा चांगला गेला नव्हता. स्मिथने १४ सामन्यांमध्ये २५.९१ च्या सरासरीने ३११ धावा केल्या होत्या. स्मिथच्या नेतृत्वामध्ये राजस्थानचा संघ गुणतालिकेमध्ये तळाला राहिला होता. त्यानंतर त्याला कर्णधारपदावरुन हटवण्याबरोबर राजस्थान संघाने रिटेन न करण्याचा निर्णय घेतला होता. स्मिथचं एकंदर आयपीएल करियरमधील आकडेवारी खूपच प्रभावशाली आहे. त्याने ९५ आयपीएल सामन्यांमध्ये ३५.३४ च्या सरासरीने दोन हजार ३३३ धावा केल्या असून यामध्ये एक शतक आणि ११ अर्थशतकांचा समावेश आहे.