जगभर आणि भारतभर करोनाचं थैमान सुरू असताना IPL स्पर्धा कशी खेळवली जात आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. त्यातच काही खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ करोना पॉझिटिव्ह आल्यामुळे एक सामना देखील पुढे ढकलावा लागला होता. या पार्श्वभूमीवर आयपीएलचा उर्वरीत हंगाम स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे अनेक संमिश्र प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत. स्थगित झालेली स्पर्धा पुन्हा कधी सुरू होणार? याविषयी देखील चर्चा सुरू झाली असताना BCCI चे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी यासंदर्भात सूतोवाच केले आहेत. “आम्ही लवकरच भेटणार असून स्थगित करण्यात आलेला हंगाम पूर्ण कधी करता येईल, त्याविषयी निर्णय घेतला जाईल. यासाठी आम्हाला स्पर्धा पूर्ण करण्याची कधी संधी मिळेल, ते देखील पाहावं लागणार आहे”, असं राजीव शुक्ला म्हणाले आहेत.

 

“बीसीसीआयनं तूर्तास आयपीएल स्पर्धा स्थगित करून एक चांगला निर्णय घेतला आहे. ही स्पर्धा आहे तिथूनच पुन्हा सुरू करण्याबाबत किंवा तिचं पुन्हा नियोजन करण्याबाबत नंतर निर्णय घेतला जाईल. देशातली करोनाची परिस्थिती लक्षात घेता खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसाठी हा निर्णय हितकारक आहे”, असं ट्वीट राजीव शुक्ला यांनी केलं आहे.

खेळाडू आणि सपोर्ट स्टाफही आले पॉझिटिव्ह!

सोमवारी कोलकाता संघाच्या दोन खेळाडूंना करोनाची लागण झाली होती. त्या पार्श्वभूमीवर सोमवारचा कोलकाता विरुद्ध बंगळुरू सामना पुढे ढकलावा लागला होता. मंगळवारी चेन्नईच्या संघासोबत असणारे तीन सपोर्ट स्टाफ देखील करोना पॉझिटिव्ह आल्यामुळे चिंता वाढल्या होत्या. याआधीच संपूर्ण आयपीएल स्पर्धा मुंबईत खेळवण्याचा विचार बीसीसीआयनं सुरू केला होता. मात्र, अखेर खेळाडू आणि त्यांच्यासोब असणाऱ्या सपोर्ट स्टाफच्या आरोग्याचा विचार करून आयपीएल स्पर्धा तूर्तास स्थगित करण्यात आल्याचं बीसीसीआयकडून जाहीर करण्यात आलं आहे.

IPL स्थगित : बायो-बबल ते न्यायालयातील याचिका… कालपासून नक्की काय काय घडलं?; जाणून घ्या १० महत्वाचे मुद्दे

बायो बबलचं काय झालं?

दरम्यान, आयपीएल स्पर्धा सुरू करण्यापूर्वी खेळाडू आणि सपोर्ट स्टाफच्या सुरक्षेसाठी करण्यात आलेल्या बायो-बबलच्या नियमांमुळे हे सर्व सुरक्षित असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र, आता बायो-बबल असूनही खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ पॉझिटिव्ह आल्यामुळे बायो-बबलच्या परिणामकारकतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागलं आहे.

खेळाडूंच्या आरोग्याला प्राधान्य

“आयपीएल तूर्तास स्थगित करण्यात आली आहे. आम्ही सर्व टीम, ब्रॉडकास्टर्स आणि या स्पर्धेशी संबंधित सगळ्यांशी चर्चा केली. सध्या देशात निर्माण झालेली परिस्थिती आणि लोकभावना पाहाता आयपीएल स्थगित करण्यालाच प्राधान्य देण्यात आलं. आमच्यासाठी खेळाडूंचं आरोग्य ही सर्वात महत्त्वाची बाब असून बीसीसआयची त्यासाठीची बांधिलकी कायमच राहील. आम्ही लवकरच भेटून आयपीएल पुन्हा कधी घेता येईल किंवा पुन्हा नियोजन करता येईल का याविषयी निर्णय घेऊ”, असं देखील राजीव शुक्ला यांनी सांगितलं आहे.