नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १३व्या हंगामाच्या आयोजनात उत्तेजकांचे नमूने सापडू नयेत, यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) खबरदारी बाळगत आहे. परंतु यंदा राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थेवर (नाडा) बंदी असल्याने ‘बीसीसीआय’ विदेशी संस्थांची मदत घेण्याची शक्यता आहे.

संयुक्त अरब अमिराती येथे १९ सप्टेंबर ते ८ नोव्हेंबरदरम्यान ‘आयपीएल’चे आयोजन करण्यात येणार आहे. परंतु करोना साथीच्या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक महिन्यांपासून खेळाडू खेळापासून दूर असल्याने त्यांच्याकडून जाणते-अजाणतेपणी उत्तेजकांचे सेवन होऊ शकते. त्यामुळे ‘नाडा’ अमिरातीतील उत्तेजक प्रतिबंधक संस्था अथवा स्वीडनच्या आंतरराष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थेची मदत घेऊ शकते.

पुढील आठवडय़ात ‘आयपीएल’चे अंतिम वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर ‘बीसीसीआय’ची ‘नाडा’च्या अधिकाऱ्यांसह बैठक रंगणार आहे. त्यानंतर ‘नाडा’ उत्तेजकांसंबंधीच्या कार्याला प्रारंभ करेल.