आयपीएलचा तेरावा हंगाम आयोजित करण्यासाठी बीसीसीआय सज्ज झालेलं आहे. १९ सप्टेंबर ते ८ नोव्हेंबर या काळात युएईमध्ये आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं आयोजन केलं जाणार आहे. काही दिवसांपूर्वी गव्हर्निंग काऊन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी यासंदर्भात माहिती दिली. सध्या जगभरात करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता बीसीसीआय या स्पर्धेसाठी सर्व संघांना कडक नियम आखून देणार आहेत. गव्हर्निंग काऊन्सिलच्या आगामी बैठकीत याबद्दल घोषणा होणार असल्याचं कळतंय. बीसीसीआयने तेराव्या हंगामासाठी काही मार्गदर्शक तत्वे तयार केली आहेत.

अवश्य वाचा – तुमच्या नियमाप्रमाणे काम करेन, समालोचनाची संधी द्या ! संजय मांजरेकरांची BCCI ला विनंती

ज्यामध्ये प्रेक्षकांना मैदानात परवानगी नाही, स्टुडीओमध्ये समालोचन करणारी मंडळी सहा फुटांचं अंतर राखून बसतील, डग आऊटमध्ये खेळाडूंची कमी गर्दी, ड्रेसिंग रुममध्ये १५ पेक्षा जास्त खेळाडूंना परवानगी नाही. प्रत्येक खेळाडूची दोन आठवड्यात ४ करोना चाचणी आणि सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळून post match presentation असे काही नियम बीसीसीआयने तयार केल्याचं कळतंय. या नियमांबद्दल बीसीसीआयने सर्व संघमालकांनाही कल्पना दिलेली आहे. इंडियन एक्सप्रेसने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. भारत सरकारकडून अद्याप बीसीसीआयला तेराव्या हंगामासाठी प्रवासाची परवानगी मिळालेली नसली तरीही येत्या काही दिवसांमध्ये याबद्दल अधिकृत घोषणा होणार आहे.

“पत्नी आणि गर्लफ्रेंड यांना युएईला येऊ द्यायचं की नाही हा निर्णय बीसीसीआय घेणार नाही, आम्ही तो त्या-त्या संघमालकांवर सोडला आहे. पण आम्ही तयार केलेल्या नियमांचं प्रत्येकाला पालन करावच लागेल. इतकच काय संघाचा बसचालकही Bio Secure Bubble सोडून जाऊ शकणार नाही. पुढील आठवड्यात बैठक पार पडल्यानंतर प्रत्येक संघमालकांना मार्गदर्शक तत्व आणि नियम दिले जातील. आता सर्वांना याबद्द कल्पना देण्यात आली आहे. त्यामध्ये काही समस्या असेल तर ते आमच्याशी चर्चा करु शकतात, त्यावर तोडगा काढता येईल.” बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना माहिती दिली. त्यामुळे गव्हर्निंग काऊन्सिलच्या आगामी बैठकीत याबद्दल काय अधिकृत निर्णय घेतला जातोय याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.