आयपीएलमधील फिक्सिंग आणि जावई गुरूनाथ मय्यपन याचे सट्टेबाजांशी असलेले संबंध यांच्यामुळे अडचणीत आलेले बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी पदाचा राजीनामा देण्यास रविवारी पुन्हा एकदा नकार दिला. ‘मी दोषी नाही, माझ्यावर कोणतेही आरोप नाहीत, त्यामुळे माझ्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही, सर्वाचा मला पाठिंबा असून मी राजीनामा देणार नाही,’ असा सूर श्रीनिवासन यांनी आळवला. स्वत:ला सावरून घेतल्यावर मुंबई पोलिसांच्या अटकेत असलेला जावई गुरुनाथ मयप्पन याच्यावर जास्त बोलणे त्यांनी टाळले. ‘दोषींवर कडक कारवाई करू,’ असे सांगत असतानाच गुरुनाथवरील आरोपांची तपासणी करण्यासाठी त्रिसदस्यीय आयोगाची स्थापना करण्यात येईल आणि त्यामध्ये माझी कोणतीच भूमिका नसेल हे त्यांनी स्पष्ट केले.
गुरुनाथ संघाचा नक्की कोण होता, या प्रश्नाला सामोरे जाताना, संघाच्या कारभारात गुरुनाथची कोणतीच भूमिका नव्हती. गुरुनाथ हा उत्साही असल्यामुळे तो संघाबरोबर पाहायला मिळायचा. गुरुनाथ कंपनीच्या व्यवस्थापनात कुठेच नव्हता, असे एन. श्रीनिवासन यांनी सांगितले. दरम्यान, गैरव्यवहार रोखण्यासाठी नवीन कायदा जुलै किंवा ऑगस्टपर्यंत येईल, असा दावा सरकारने केला आहे. कायदामंत्री कपिल सिब्बल यांनी या कायद्याची संरचना करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ‘जुलै किंवा ऑगस्टदरम्यान संसदेमध्ये स्पॉट-फिक्सिंग कायद्याचा मसुदा मांडण्यात येईल आणि यावर चर्चा करून सर्व मान्यतेने अमलात येईल,’ अशी माहिती सिब्बल यांनी दिली.
श्रीशांत, अंकितची जामिनासाठी धाव
स्पॉट-फिक्सिंग प्रकरणात अटकेत असलेला भारताचा वेगवान गोलंदाज एस. श्रीशांत, क्रिकेटपटू अजित चंडिला आणि अन्य दोन सट्टेबाजांच्या पोलीस कोठडीमध्ये दिल्ली पोलिसांनी आणखी दोन दिवसांची वाढ केली आहे. दिल्ली न्यायालयाच्या सुनावणीदरम्यान एस. श्रीशांत आणि अंकित चव्हाण यांनी जामीन अर्ज सादर केला. २ जूनला असलेल्या आपल्या विवाहाकरिता अंकितने जामिनाचा अर्ज केला आहे. यावर २८ मे रोजी सुनावणी होईल.