आयपीएल स्पर्धेतील स्पॉटफिक्सिंगनंतर आता पोलिसांनी सट्टेबाजांवर लक्ष केंद्रित केले असून देशात विविध ठिकाणी छापे घालून ३६ जणांना अटक केली आहे. पश्चिम बंगाल, महाराष्ट्र व राजस्थान या तीन राज्यांमध्ये ही कारवाई करण्यात आली. कोलकाता पोलिसांनी उल्तंगा येथून अजित सुरेखा या बुकीसह दहा लोकांना ताब्यात घेतले. चेन्नई सुपरकिंग्ज व मुंबई इंडियन्स यांच्यात झालेल्या लढतीवेळी सट्टा लावण्यात आला होता. या लोकांकडून रोख तीन लाख रुपये, लॅपटॉप जप्त करण्यात आला.
नाशिक येथील साई पॅलेस नावाच्या बंगल्यावर पोलिसांनी छापा टाकून पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दहा मोबाइल्स, लॅपटॉप तसेच सट्टेबाजीसंदर्भात अन्य काही वस्तू जप्त करण्यात आल्या, असे सहायक पोलिस आयुक्त पंकज रहाणे यांनी सांगितले. राजेंद्र सावना (नाशिक रोड), समीर मंत्री, प्रवीण भुतडा, रवींद्र ढगे, पंकज सोमाणी (बुलढाणा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. कल्याण (ठाणे) येथून केवल भानुशाली, चेतन भानुशाली, सचिन तेली यांना गांधी चौकातील अन्नपूर्णा हॉटेलजवळ ताब्यात घेण्यात आले. पोलिस निरीक्षक आर.आर.पाटील यांनी सांगितले,की या तीन लोकांवर जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई केली जाणार आहे. हे तीन जण मेतनभाई जैन (लालबाग, मुंबई) व उमेश तथा विपुल शहा (डोंबिवली) या सट्टेबाजांकरिता काम करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्याकडून मोठय़ा प्रमाणात रोख रक्कम, लॅपटॉप, मोबाइल्स आदी वस्तू ताब्यात घेण्यात आल्या आहेत.
हैदराबाद सनरायझर्स विरुद्ध राजस्थान या सामन्यावर बेटिंग घेणाऱ्या एका बुकीसह तिघांना वडगाव शेरी येथून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून बारा मोबाइल, दोन टीव्ही, एक लॅपटॉप असे एकूण एक लाख ३३ हजार रुपयांचे साहित्य जप्त केले आहे.
पुण्यात चार जणांना अटक
अहमद अब्दुल रहेमान खोजा ऊर्फ गुड्डू (वय ३४, रा. ब्रह्मा सनसिटी, वडगाव शेरी) असे अटक केलेल्या बुकीचे नाव आहे. तर बेटिंग लावणारे अझीम महंमदअली अझीयानी, हुसेन हादी सांगलीवाला (रा. दोघेही- पॅलेस व्हय़ू सोसायटी, कल्याणीनगर) आणि अल्ताफ श्रीमंतअली लखानी (वय ४६, एम्पिरियल रेसिडन्सी, कल्याणीनगर) अटक केलेल्या इतरांची नावे आहेत. राजस्थानमधील अजमेर येथे आकाश गर्ग याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून दोन मोबाइल्स, लॅपटॉप, डीव्हीडी प्लेअर, तसेच सट्टेबाजीची चलने आदी साहित्य जप्त करण्यात आले आहे.