स्पॉट-फिक्सिंग आणि असंख्य वादांच्या भोवऱ्यात सापडलेले असतानाही इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) फ्रँचायजींचे गेल्या हंगामातील वर्तन बीसीसीआयने आखून दिलेल्या नियमांच्या चौकटीत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) लाचलुचपत प्रतिबंधक विरोधी पथकाने केलेल्या ई-मेलमध्ये अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. क्रिकेट म्हणजे ‘सभ्य गृहस्थांचा खेळ’ ही प्रतिमा जोपासण्याऐवजी उच्छृंखल वर्तनाचे धडे फ्रँचायजी आणि पर्यायाने खेळाडू गिरवत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
किंग्ज इलेव्हन पंजाब संघाची मालकीण आणि अभिनेत्री प्रीती झिंटातर्फे आयोजित बोट पार्टी, चेन्नई सुपर किंग्स संघातील एका खेळाडूच्या खोलीत एक दिवस वास्तव्याला असलेली तरुणी, कोलकाता नाइट रायडर्स संघाचा मालक व अभिनेता शाहरुख खानच्या मित्राने संघासाठी आयोजित केलेली पार्टी या आणि या स्वरूपाच्या असंख्य घटनांवर पथकाने आक्षेप नोंदवला आहे.
३० एप्रिल २०१४ रोजी प्रीती झिंटाने मुंबईनजीक बोटीवर पार्टीचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला प्रीती झिंटाची एक मैत्रीण उपस्थित होती. ८ मे रोजी शाहरुख खानच्या मित्राने कोलकाता नाइट रायडर्स संघासाठी मेजवानीचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला संघव्यवस्थापनाखेरीज अनेक जण उपस्थित होते. ९ एप्रिल रोजी दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाचे प्रायोजक असलेल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये शाही मेजवानी आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाला संघांशी संलग्न नसलेल्या १००हून अधिक व्यक्ती उपस्थित होत्या. ८ मे रोजी रात्री चेन्नई सुपर किंग्स संघाच्या खेळाडूच्या खोलीत एका महिलेने रात्री ९.१५ वाजता प्रवेश केला आणि सकाळी ६.०५ मिनिटांनी ती बाहेर पडली. ही महिला जवळची मैत्रीण असल्याचा खुलासा या खेळाडूने केला आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबच्या एका वरिष्ठ खेळाडूने आपल्या मित्राला हॉटेलच्या खोलीत प्रवेश दिला. हा मित्र संघाच्या बसमध्येही उपस्थित होता. या स्वरूपाचे असंख्य दाखले लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने दिले आहेत. घरच्या मैदानावर सामना असताना खेळाडू राहण्यासाठी घरी जात असल्याने त्यांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणे कठीण असल्याचे पथकाने नमूद केले आहे.
खेळाडूंनी खासगी व्यक्ती किंवा प्रायोजकांनी आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहू नये, संघव्यवस्थापन सोडून कोणतीही व्यक्ती बसमध्ये असू नये, खेळाडूंच्या खोलीत पत्नी, प्रेयसी किंवा जवळचे नातेवाईकवगळता कोणीही राहू शकत नाही, खेळाडू आणि प्रशिक्षक सहयोगींनी व्यवस्थापकाला कल्पना न देता हॉटेल सोडू नये, अशा लाचलुचपत विभागाच्या नियमांचे उल्लंघन फ्रँचायजींनी केले आहे. त्यामुळेच पथकाने ई-मेलद्वारे बीसीसीआयला याची कल्पना दिली आहे.