सुरेख कामगिरी करूनही संघाबाहरे बसाव्या लागणाऱ्या राहुलची खंत

दुबई :  मागील काही काळापासून मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा करूनही शैलीदार फलंदाज लोकेश राहुल याला सध्या तरी भारताच्या एकदिवसीय संघातून बाहेरच बसावे लागत आहे. त्यामुळे काही वेळा उत्तम कामगिरी करूनसुद्धा संघात स्थान न मिळत असल्यामुळे निराश व्हायला होते, अशी खंत राहुलने व्यक्त केली. मात्र यामुळे व्यथित न होता प्रयत्न करत राहण्याचा निर्धारही त्याने केला आहे.

दुबईत सुरू असलेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी अफगाणिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात राहुलला प्रथमच संधी मिळाली. त्या संधीचा पुरेपूर फायदा उचलत त्याने ६० धावाही केल्या, मात्र तरीही संघातील स्थान पक्के आहे, असे गृहीत धरून चालता येणार नाही, याची राहुलला जाणीव आहे.

‘‘मला माहीत आहे की, माझ्या खेळात काही कमतरता आहेत. मला कोणत्याही क्रमावर फलंदाजीची संधी मिळाली तरी मी ती दोन्ही हातांनी स्वीकारण्यासाठी तयार आहे. मात्र संघातील स्थानासाठी वाढती चुरस आणि संघर्ष यामुळे कोणीही स्वत:चा संघातील सहभाग खात्रीने निश्चित मानू शकत नाही,’’ असे राहुल म्हणाला.

२०१६ मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या राहुलच्या वाटय़ाला आतापर्यंत फक्त १३ सामने आले आहेत. यापैकी त्याने सात सामन्यांत सलामीवीर म्हणून भूमिका निभावली आहे.

‘‘विविध क्रमांकांवर फलंदाजी करणे हे आव्हानात्मक आहे. कनिष्ठ स्तरावरच्या क्रिकेटमध्ये मी नेहमीच वरच्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे, त्यामुळे मला तेथे फलंदाजी करायला आवडते. मात्र संघ व्यवस्थापन माझ्याकडून खालच्या स्थानावर संघाचा डाव सांभाळण्याची अपेक्षा करत असेल तरी ती पूर्ण करण्यासाठी मी सज्ज आहे,’’ असे राहुलने सांगितले.