अहमदाबाद कसोटी सामन्यात अवघ्या दोन दिवसांमध्ये १० विकेटनं दारुण पराभव झाल्यानंतर इंग्लंडचा कर्णदार जो रुट म्हणाला की, मोटेराची खेळपट्टी कसोटी सामन्यासाठी उपयुक्त होती की नाही, हे खेळाडू ठरवू शकत नाही. ते काम आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचं (आयसीसी) आहे. अक्षर पटेल आणि आर. अश्विन यांच्या फिरकीपुढे इंग्लंडच्या फलंदाजांनी लोटांगण घातलं होतं. इंग्लंडचा पहिला डाव ११२ तर दुसरा डाव फक्त ८१ धावांत संपुष्टात आला. हा कसोटी सामना भारतीय संघानं १० विकेटनं जिंकला. सामन्यानंतर बोलताना जो रुट यानं खेळपट्टीला दोष देणं चुकीचं असल्याचं म्हटलं. पण तो म्हणाला की, खेळपट्टी कसोटी सामन्यासाठी उपयुक्त होती की नाही, याचा विचार आयसीसीने करावा.

सामन्यानंतर बोलताना रुट म्हणाला की, ‘मोटेराची खेळपट्टी खूपच आव्हानात्मक होती. येथे फलंदाजी करणं कठीण होतं. पण खेळपट्टी कशी होती, याचा निर्णय खेळाडू करु शखत नाही. हे आयसीसीचं काम आहे. पण एक खेळाडू म्हणून कोणत्याही परिस्थितीत आपलं सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करायचं असतं.’

आणखी वाचा- चांगली की वाईट?; खेळपट्टीवरुन आजी-माजी क्रिकेटपटूंमध्येच रंगला सामना

पहिल्या डावांत मोठी धावसंख्या उभारण्याची संधी आम्ही गमावली. पहिल्या डावांत आम्ही २५० पर्यंत धावसंख्या उभारली असती तर निकाल वेगळा लागला असता. ती संधी आम्ही गमावली. एकवेळ आम्ही दोन विकेटच्या मोबदल्यात ७४ धावा जोडल्या होत्या. आमच्याकडे मोठी धावसंख्या उभारण्याची संधी होती. मात्र ती गमावली, असं रुट म्हणाला.

Video : विजयावर शिक्कामोर्तब करणाऱ्या रोहितचे विराटने ‘असं’ केलं अभिनंदन

कोहलीकडून खेळपट्टीची पाठराखण –
खेळप्टी नव्हे तर सुमार फलंदाजीमुळे तिसरा कसोटी सामना दोन दिवसांत निकाली ठरला, अशी प्रतिक्रिया भारताचा कर्णधार विराट कोहलीनं व्यक्त करत मोटेराच्या खेळपट्टीची पाठराखण केली. पहिल्या जावात खेळपट्टी फलंदाजीसाठी पूर्णपणे योग्य होती. फक्त काही चेंडू अचानक उसळी घेत होते. माझ्या मते या सामन्यात दर्जेदार फलंदाजी पाहायला मिळाली नाही. भारतीय संघ ३ बाद १०० अशा सुस्थितीत असतानाही १५० धावांच्या आत तंबूत परतला, असं कोहलीनं सांगितलं.