आजपासून इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. या सामन्यात मैदानात पाऊल ठेवताच इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने मोठा विक्रम रचला. इंग्लंडचा सर्वाधिक कसोटी सामने खेळणारा क्रिकेटपटू म्हणून अँडरसनने नवा विक्रम केला आहे. त्याने इंग्लंडचा माजी कर्णधार अलिस्टर कूकला मागे टाकले. २००६ ते २०१८ या काळात कूकने १६१ आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यांमध्ये इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले होते. अँडरसन आज १६२वा कसोटी सामना खेळत आहे.

१८ वर्षांपूर्वी कसोटी पदार्पण

अँडरसनने १८ वर्षांपूर्वी २००३मध्ये लॉर्ड्स येथे झिम्बाब्वेविरुद्धच्या कसोटी सामन्यात पदार्पण केले होते. अँडरसन शिवनारायण चंद्रपॉल (१६४), राहुल द्रविड (१६४) आणि जॅक कॅलिस (१६६) यांनाही मागे टाकू शकतो. कसोटीत अँडरसनच्या नावावर ६१६ बळी जमा आहेत. मुथय्या मुरलीधरन (८००), शेन वॉर्न (७०८) आणि अनिल कुंबळे (६१९) या दिग्गज गोलंदाजांनंतर अँडरसन सर्वाधिक कसोटी बळी घेणारा गोलंदाज आहे.

हेही वाचा – भारताची युवा तायक्वांदो खेळाडू अरुणा तन्वर चालली टोकियोला!

 

अँडरसनने आज नोंदवलेल्या विक्रमावेळी अनेक मीम सोशल मीडियावर व्हायरल झाले. २००३ मध्ये नोकिया कंपनीने ११०० मॉ़डेल हा फोन बाजारात आणला होता, त्यावेळी अँडरसनने पदार्पण केले, अशी एक पोस्टही ट्विटरवर व्हायरल झाली आहे.

 

कोण आत कोण बाहेर?

आजच्या सामन्यात न्यूझीलंडचा संघ विकेटकिपर फलंदाज बीजे वॉटलिंग आणि केन विल्यमसनशिवाय मैदानात उतरला आहे. हे दोघेही खेळाडू दुखापतग्रस्त असून टॉम लॅथमकडे कर्णधारपद देण्यात आले आहे. संघात ट्रेंट बोल्टने पुनरागमन केले आहे. इंग्लंडच्या संघात निलंबित खेळाडू ओली रॉबिनसनबदली ओली स्टोनला स्थान देण्यात आले आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा – महेंद्रसिंह धोनीच्या फार्म हाऊसवर घडलं ‘मैत्री’चं अतुट दर्शन..! पाहा व्हिडिओ

विक्रमी कसोटीपूर्वी अँडरसनची प्रतिक्रिया

”ही १५ वर्ष अभूतपूर्व होती. कूकने जितके सामने खेळले तितके मी खेळलो हे जाणून. ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. मला वाटले होते, की मी कसोटी क्रिकेटमधील चांगला खेळाडू नाही. काऊंटी क्रिकेट खूप बदलले आहे. मला आठवते नासीर हुसेनने माझ्यासाठी फाईन लेगला खेळाडू ठेवला नव्हता. माझा पहिला चेंडू हा नो-बॉल होता, ज्यानंतर मी घाबरुन गेलो होतो”, असे अँडरसनने सामन्यापूर्वी म्हटले होते.