आज उपांत्य लढतीत बायर्न म्युनिच पाहुण्यांना धक्का देण्यास उत्सुक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बर्लिन : झिनेदीन झिदानच्या आक्रमक मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या रेयाल माद्रिदला हिसका दाखवण्यासाठी जेम्स रॉड्रिगेजसह बायर्न म्युनिचचा संघ सज्ज झाला आहे. बुधवारी रेयाल आणि बायर्न यांच्यात होणाऱ्या चॅम्पियन्स लीगच्या उपांत्य फेरीच्या पहिल्या टप्प्यातील सामन्याकडे फुटबॉलप्रेमींचे लक्ष लागलेले आहे.

एके काळी रेयाल माद्रिद संघाचा घटक असलेला जेम्स आता म्युनिचसंघातील महत्त्वाचा खेळाडू आहे. त्यामुळे रेयालमध्ये खरोखर काय उणिवा आहेत, ते दाखवून देण्याच्या इराद्यानेच तो उतरवणार आहे. जेम्सने गतवर्षीच्या जुलै महिन्यातच रेयालमधून बाहेर पडत बायर्न म्युनिचचा मार्ग पत्करला.

‘‘हा सामना माझ्यासाठी सर्वार्थाने महत्त्वाचा आहे. मी तीन वर्षे रेयाल माद्रिद संघासमवेत होतो. त्यामुळे तिथेही माझे काही चांगले मित्र असून काही चांगल्या आठवणीदेखील आहेत. पण मी आता केवळ माझ्या संघाचा विचार करीत असून आम्ही कसे जिंकू एवढाच प्रश्न डोक्यात घोळत आहे,’’ असे जेम्सने एका स्पॅनिश वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

मूळ कोलंबियाच्या जेम्स रॉड्रिगेजने ब्राझिलमध्ये २०१४मध्ये झालेल्या विश्वचषकात अत्यंत मोलाची कामगिरी बजावली होती. त्यामुळे रेयाल माद्रिद क्लबमध्येदेखील त्याच्या भूमिकेला वजन आले होते. मात्र २०१६च्या जानेवारीत जेव्हा झिदान रेयाल माद्रिदचा प्रशिक्षक झाला, तेव्हा त्याने जेम्सला संघात फारसे महत्त्वाचे स्थान दिले नाही. त्यातच रेयालचा त्याचा संघसहकारी आणि मुख्य खेळाडू असलेल्या ख्रिस्तियानो रोनाल्डोनेदेखील जेम्सच्या फॉर्मबाबत मतप्रदर्शन केल्यानंतर जेम्सने बाहेर पडण्याचा मार्ग स्वीकारला. त्यानंतर जेम्सने त्याचे रेयालचे जुने प्रशिक्षक कार्लो अ‍ॅन्सेलोट्टी यांच्या संघाचा मार्ग पत्करला. परंतु, त्यानंतर काही महिन्यांतच बायर्न म्युनिच संघाने अ‍ॅन्सेलॉटी यांची गच्छंती केली. मात्र त्यांचे वारसदार असलेल्या जुप हेन्केस यांनी जेम्सला भरपूर वाव दिला.

‘‘जेम्सला धोके पत्करू देत मनमोकळे खेळू दिले की त्याचा खेळ बहरतो. त्याला चुका करू द्यायची परवानगी दिली म्हणजे तो अधिक चांगला खेळ करून दाखवतो. बायर्नकडून सर्वाधिक गोल करणाऱ्या रॉबर्ट लेवानडोवस्कीला जेम्सची दमदार साथ मिळत असल्याने संघाची कामगिरीदेखील उंचावत आहे,’’ असे मत हेन्केस यांनी व्यक्त केले.

दोनदा चॅम्पियन्स लीगचा किताब पटकावणाऱ्या रेयाल संघाचा जेम्स हा घटक होता. मात्र त्या दोन्ही अंतिम सामन्यांत जेम्सला प्रत्यक्ष सामना खेळण्याची संधी देण्यात आली नव्हती.

रेयाल संघाने चार मोसमांमध्ये सातत्याने बायर्नला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. त्यात गतवर्षी तर उपांत्यपूर्व फेरीत त्यांनी बायर्नला पराभूत केले होते. मात्र यंदा जेम्समुळे संघाच्या कामगिरीत बदल होईल, असा विश्वास बायर्नच्या प्रशिक्षकांसह संपूर्ण संघाला वाटत आहे.

संभाव्य संघ

रेयाल माद्रिद : ख्रिस्तियानो रोनाल्डो, करीम बेन्झेमा, नवास कारवाजाल, वारने, रामोस, मार्सेलो, मोड्रिक, केसमिरो, क्रोस, इसको. प्रशिक्षक – झिनेदीन झिदान.

बायर्न म्युनिच : जेम्स रॉड्रिगेज, मेल्स मिलर, रॉबर्ट लेवांडोस्कीयुलेरीच, किमीच, अलावा मार्टीनेझ, थियागो रॉबेन, बोटेंग, प्रशिक्षक : जुप हेन्केस.

’ वेळ : बुधवारी मध्यरात्री १२.१५ ’ प्रक्षेपण : सोनी टेन २

दोन्ही संघांना समान संधी

दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत २५ सामने झाले असून त्यातील प्रत्येकी ११ सामने दोन्ही संघांनी जिंकले आहेत, तर दोन सामने बरोबरीत सुटले आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: James rodriguez ready to show real madrid
First published on: 25-04-2018 at 03:26 IST