भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला मागे टाकत संघाचा प्रमुख जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराहने एक अनोखा विक्रम आपल्या नावे केला आहे. २०२० वर्षात बुमराह सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू ठरला आहे. बुमराहने आतापर्यंत १.३८ कोटी रुपयांची कमाई केली आहे. विराट कोहलीला या यादीत पहिलं स्थान कायम राखण्याची संधी होती. परंतू पहिल्या कसोटी सामन्यानंतर विराटने भारतात परतण्याचा निर्णय घेतल्यामुळे बुमराहने या यादीत पहिलं स्थान मिळवलं आहे.

बीसीसीआयने आपल्या खेळाडूंसाठी ४ श्रेणी केल्या आहेत. A+, A, B आणि C अशा चार गटांमध्ये बीसीसीआय आपल्या खेळाडूंना विभागतं. बुमराह हा A+ श्रेणीत येतो. बीसीसीआय खेळाडूंना कसोटी क्रिकेटचे १५ लाख, वन-डे सामन्याचे ६ लाख तर टी-२० सामन्याचे ३ लाख रुपये देतं. बुमराहने २०२० वर्षात आतापर्यंत ४ कसोटी*, ८ टी-२० आणि ९ वन-डे सामने खेळले आहेत. यानुसार बुमराहने आतापर्यंत १ कोटी ३८ लाखांची कमाई केली आहे. विराट कोहलीने आतापर्यंत ३ कसोटी, ९ वन-डे आणि १० टी-२० सामन्यांसह १ कोटी २९ लाखांची कमाई केली आहे.

अवश्य वाचा – पंत अपयशी ठरला तर तिसऱ्या कसोटीत काय कराल?? संघनिवडीवरुन गंभीरचं टीम मॅनेजमेंटवर टीकास्त्र

बुमराह आणि कोहलीनंतर या यादीत रविंद्र जाडेजा ९६ लाखांसह तिसऱ्या स्थानावर आहे. भारतीय संघाचा उप-कर्णधार रोहित शर्मा यंदा दुखापतीमुळे अनेक आंतरराष्ट्रीय सामन्यांना मुकला….ज्यामुळे त्याला यंदा Top 5 मध्येही स्थान मिळवता आलेलं नाही. रोहितने २०२० वर्षात आतापर्यंत ३० लाखांच्या घरात कमाई केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेसाठी रोहित सध्या सिडनीत आहे. त्यामुळे तिसऱ्या कसोटीसाठी त्याला भारतीय संघात स्थान मिळाल्यास २०२० वर्षातला रोहितचा तो पहिला कसोटी सामना ठरणार आहे.