नवी दिल्ली : भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराला भारतीय संघात पुनरागमन करण्यापूर्वी स्वत:ची तंदुरुस्ती सिद्ध करावी लागणार आहे. पाठीच्या दुखापतीतून सावरलेल्या बुमराची वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वीच्या सराव सत्रात चाचणी घेण्यात येणार आहे.

२६ वर्षीय बुमरा ऑक्टोबरमध्ये झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेपासून संघाबाहेर असून पुढील वर्षी रंगणाऱ्या महत्त्वपूर्ण न्यूझीलंडच्या दौऱ्यापूर्वी बुमराने संघात परतावे, अशी संघ व्यवस्थापनाला अपेक्षा आहे.

‘‘संघ व्यवस्थापनाच्या नियमांनुसार बुमराला संघात परतण्यापूर्वी स्वत:ची तंदुरुस्ती सिद्ध करावी लागेल. त्यामुळेच विशाखापट्टणमला १८ डिसेंबर रोजी खेळल्या जाणाऱ्या विंडीजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी बुमराची तंदुरुस्ती चाचणी घेण्यात येईल. भुवनेश्वर कुमारलासुद्धा बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघात निवड होण्यापूर्वी अशा प्रकारच्या चाचणीला इंदूर येथे सामोरे जावे लागले होते,’’ असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सूत्रांनी सांगितले.