गलवान खोऱ्यात भारत आणि चीन यांच्यातील संघर्षामुळे बीसीसीआयला, यंदाच्या आयपीएलसाठी VIVO या चिनी मोबाईल कंपनीसोबतचा करार स्थगित करावा लागला. २०१८ साली बीसीसीआय आणि VIVO कंपनीचा ५ वर्षांचा करार झाला होता. आयपीएल स्पर्धेच्या स्पॉन्सरशिपसाठी VIVO ने बीसीसीआयला २१९९ कोटी रुपये दिले होते. प्रत्येक हंगामाला VIVO कंपनी बीसीसीआयला ४४० कोटी रुपये देत होती. VIVO कंपनीसोबतचा करार स्थगित झाल्यानंतर आता बीसीसीआयला तेराव्या हंगामासाठी नव्या स्पॉन्सरचा शोध घ्यावा लागणार आहे. परंतू बीसीसीआयला नवीन स्पॉन्सरबद्दल अजिबात चिंता नाहीये, लवकरच नवीन स्पॉन्सरबद्दल घोषणा केली जाईल अशी माहिती बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने InsideSports या संकेतस्थळाला दिली.

“आतापर्यंत अनेक ब्रँड आणि कंपन्या IPL स्पॉन्सरशीपसाठी प्रयत्न करत आहेत. आम्ही अद्याप याबद्दल निर्णय घेत आहोत, चर्चा सुरु आहे. गुरुवारी संध्याकाळपर्यंत नव्या स्पॉन्सरबद्दलचा निर्णय होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे.” बीसीसीआय अधिकाऱ्याने माहिती दिली. InsideSports ने दिलेल्या वृत्तानुसार, Reliance Jio, Byju’s, Amazon आणि इतर काही कंपन्यांनी स्पॉन्सरशिपसाठी बीसीसीआयसोबत चर्चा करायला सुरुवात केली आहे.

काही महिन्यांपूर्वी गलवान खोऱ्यात भारत आणि चिनी सैनिक यांच्यात संघर्ष झाला. यामध्ये २० भारतीय जवानांना हौतात्म्य पत्करावं लागलं. या घटनेनंतर देशभरात चिनी वस्तूंविरोधात वातावरण निर्माण झालं. बीसीसीआयनेही VIVO कंपनीसोबतचा करार मोडावा यासाठी सोशल मीडियावर दबाव वाढत होता. परंतू गव्हर्निंग काऊन्सिलने पहिल्यांदा VIVO कंपनीची स्पॉन्सरशिप कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. परंतू यानंतर देशभरात चाहत्यांची नाराजी व इतर जाहीरातदारांची नाराजी यामुळे बीसीसीआयने एक पाऊल मागे येत वर्षभरासाठी VIVO सोबतचा करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला.