एका कार्यक्रमात महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे सध्या निलंबनाची शिक्षा भोगत असलेल्या भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पंडय़ा व लोकेश राहुल यांनी मंगळवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) मुख्य कार्यकारी अध्यक्ष राहुल जोहरी यांच्याशी चर्चा केली. महिलांसंबंधी केलेल्या विधानामुळे दोघांनीही आपापले मत जोहरी यांच्यासमोर मांडले.

दोघांनीही बीसीसीआयच्या आदेशानुसार दूरध्वनीच्या माध्यमाद्वारे जोहरींशी संवाद साधला. ‘‘जोहरी यांनी पंडय़ा व राहुल यांच्याशी चर्चा केली आहे. त्यानुसार जोहरी यांनी दोघांनाही त्या कार्यक्रमाच्या रूपरेषेबाबत विचारणा केली व दोघांच्या उत्तरांवर आधारित जोहरी यांना बुधवारी सकाळपर्यंत प्रशासकीय समितीला अहवाल सादर करायचा आहे,’’ असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले.जोहरी यांनी महिलांसंबंधी पंडय़ा-राहुल यांनी केलेल्या विधानाविषयी काहीही विचारणा केली नाही, असे समजते.