जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूसाठी दिल्या जाणाऱ्या फिफा बलॉन डी’ऑर पुरस्कारावर बार्सिलोना आणि अर्जेटिनाचा महान खेळाडू लिओनेल मेस्सीने गेली चार वर्षे हुकुमत गाजवली होती. मात्र सोमवारी होणाऱ्या कार्यक्रमात रिअल माद्रिद आणि पोर्तुगालचा अव्वल फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो हा मेस्सीची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी सज्ज झाला आहे.
बलॉन डी’ऑर पुरस्कारासाठी रोनाल्डो, मेस्सी आणि बायर्न म्युनिक तसेच फ्रान्सचा फुटबॉलपटू फ्रँक रिबरी यांना नामांकन मिळाले आहे. पण या मोसमात तब्बल ६९ गोल करणारा रोनाल्डो दुसऱ्यांदा फिफा बलॉन डी’ऑर पुरस्कारावर नाव कोरण्याची शक्यता आहे. रोनाल्डोला आपल्या संघाला या मोसमात कोणत्याही प्रतिष्ठेच्या स्पर्धेचे जेतेपद पटकावून देता न आले तरी त्याचा फॉर्म वाखाणण्याजोगा होता. सर्व स्पर्धामध्ये गुणवत्तेची छाप पाडणाऱ्या रोनाल्डोने स्वीडनविरुद्धच्या सामन्यात हॅट्ट्रिक झळकावत पोर्तुगालला फिफा विश्वचषकाचे तिकीट मिळवून दिले होते.
लिओनेल मेस्सीसाठी हे वर्ष फलदायी ठरले. मेस्सीने अप्रतिम कामगिरी करत बार्सिलोनाला स्पॅनिश लीग आणि स्पॅनिश सुपर चषकाचे जेतेपद मिळवून दिले. दुखापतीमुळे गेले काही महिने तो खेळू शकला नाही, मात्र जगातील सर्वोत्तम पुरस्काराच्या शर्यतीत त्याने आपले स्थान कायम राखले. या दोघांपेक्षा फ्रँक रिबरी सर्वात यशस्वी खेळाडू ठरला. त्याने बायर्न म्युनिकला युरोपियन सुपर चषकाचे जेतेपद मिळवून देतानाच फ्रान्स संघाला फिफा विश्वचषकात स्थान मिळवून दिले. झ्युरिक येथे सोमवारी रात्री होणाऱ्या कार्यक्रमात गेल्या वर्षांतील जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूची घोषणा केली जाणार आहे.