चॅम्पियन्स लीग फुटबॉल

युव्हेंटस, बार्सिलोना, चेल्सी आणि सेव्हिया या संघांनी दोन सामने शिल्लक राखत आधीच चॅम्पियन्स लीगच्या बाद फेरीत मजल मारली आहे. युव्हेंटसने पिछाडीवरून मुसंडी मारत फेरेंकवारोस संघाचे आव्हान परतवून लावले. बार्सिलोनाने डायनानो कियिव्हवर दणदणीत विजय मिळवत या मोसमातील सलग १७व्या विजयाची नोंद केली.

ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि अल्वारो मोराटा यांच्या गोलमुळे युव्हेंटसने हंगेरीच्या फेरेंकवारोसचा २-१ असा पाडाव केला. ग गटात ते किमान दुसऱ्या क्रमांकावर राहतील, याची खात्री झाल्याने त्यांचे बाद फेरीतील स्थान निश्चित झाले. मिर्तो उझुनी याने १९व्या मिनिटालाच गोल करत फेरेंकवारोसला आघाडीवर आणले होते. त्यानंतर रोनाल्डोने ३५व्या मिनिटाला गोल करत युव्हेंटसला बरोबरी साधून दिली. भरपाई वेळेत मोराटाने गोल करत युव्हेंटसच्या विजयावर मोहोर उमटवली.

लिओनेल मेसी, फ्रेंकी डे जाँग आणि अन्य अव्वल खेळाडूंच्या अनुपस्थितीतही बार्सिलोनाने डायनानो कियिव्हचा ४-० असा धुव्वा उडवला. मार्टिन ब्रेथवेटचे दोन गोल तसेच सर्जिनो डेस्ट आणि अँथनी ग्रिझमानचा प्रत्येकी एक गोल बार्सिलोनाच्या विजयात महत्त्वपूर्ण ठरला. त्यांनी ग गटात १२ गुणांसह अग्रस्थान पटकावले.

ई गटातून चेल्सी आणि सेव्हिया या संघांनी आगेकूच केली. ऑलिव्हियर गिरौडने भरपाई वेळेत केलेल्या गोलमुळे चेल्सीने रेन्नेसचा २-१ असा पराभव केला. अखेरच्या क्षणी मुनीर इल हद्दादी याने केलेल्या गोलच्या बळावर सेव्हियाने रशियाच्या क्रॅसनोडारवर २-१ असा विजय मिळवला.

अन्य सामन्यांत, मँचेस्टर युनायटेडने इस्तंबुल बसाकसेहिर संघावर ४-१ असा दणदणीत विजय प्राप्त केला.