अलेसांड्रो मॅट्रीने अतिरिक्त वेळेत नोंदविलेल्या गोलच्या बळावर ज्युव्हेंटस संघाने गुरुवारी कोपा इटालिया चषकावर नाव कोरले. रोमा येथील स्टॅडिओ ऑलिम्पिको स्टेडियवर झालेल्या सामन्यात ज्युव्हेंटसने २-१ अशा फरकाने लॅझिओ संघाचा पराभव केला. १९९५नंतर ज्युव्हेंटसने पटकावलेले हे पहिले कोपा इटालिकाचे जेतेपद आहे. चॅम्पियन्स लीग स्पध्रेच्या ६ जून रोजी होणाऱ्या अंतिम लढतीपूर्वी ज्युव्हेंटसच्या या विजयाने बार्सिलोनावरील दडपण वाढवले आहे.
लॅझिओच्या स्टिफन राडूने चौथ्या मिनिटाला गोल करून सामन्यात १-० अशी आघाडी घेतली. मात्र, याचे दडपण न घेता ११व्या मिनिटाला ज्युव्हेंटसकडून जिऑर्जीओ चिएलिनीने गोल करून सामना २-२ असा बरोबरीत आणला. या गोलनंतर सामन्यातील आक्रमकता आणखी वाढली, परंतु मध्यंतरापर्यंत एकाही संघाला आघाडी मिळवण्यात यश मिळाले नाही. मध्यंतरानंतर दोन्ही संघानी रणनीतीत बदल करताना चेंडू सर्वाधिक काळ आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न केला. दोन्ही संघांनी राखीव खेळाडूंनी फळी मैदानात उतरवली, परंतु निर्धारित वेळेत सामना १-१ असा बरोबरीत सुटल्याने ३० मिनिटांचा अतिरिक्त वेळ देण्यात आला. ८४व्या मिनिटाला फर्नाडो लोरेंटेच्या जागी मैदानात उतरलेल्या मॅट्रीने ९७व्या मिनिटाला लॅझिओची बचावफळी भेदली आणि ज्युव्हेंटससाठी विजयी गोल केला. त्यानंतर ज्युव्हेंटसने बचावात्मक खेळ करताना चषक आपल्याला मिळेल याची काळजी घेतली.