भारतीय बॅडमिंटन संघटनेने घातलेली आजीवन बंदीची शिफारस मागे घेतल्यानंतर पहिल्यांदाच कोर्टवर उतरणाऱ्या ज्वाला गट्टाने कोरिया सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेत अश्विनी पोनप्पाच्या साथीने विजयी सलामी दिली. अश्विनीने मिश्र दुहेरीत तरुण कोनाच्या साथीने खेळताना विजयी आगेकूच केली. मात्र पुरुषांमध्ये राष्ट्रीय विजेता कदंबी श्रीकांत आणि आरएमव्ही गुरुसाईदत्त यांना अनपेक्षित पराभवाला सामोरे जावे लागले.
ज्वाला-अश्विनी जोडीने ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅना रॅनकिन आणि मॅडेलिइन स्टॅपलेटन जोडीवर २१-१०, २१-७ असा सहज विजय मिळवला. गेल्या वर्षी ऑलिम्पिकनंतर ज्वाला गट्टाने विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे अश्विनीने महाराष्ट्राच्या प्रज्ञा गद्रेसह खेळायला सुरुवात केली होती. मात्र नव्या ऊर्जेसह पुनरागमन करणाऱ्या ज्वालाने अश्विनीसह खेळण्याचा निर्णय घेतला. या जोडीने मुंबईत झालेल्या टाटा इंटरनॅशनल चॅलेंज स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत या जोडीने महिला दुहेरीच्या जेतेपदावर कब्जा केला होता. इंडियन बॅडमिंटन लीगमधील एका सामन्यात न खेळण्याच्या निर्णयामुळे ज्वालावर आजीवन बंदीची शिफारस करण्यात आली होती. या शिफारशीमुळे ज्वालाची कारकीर्द धोक्यात येण्याची शक्यता होती मात्र सनदशीर प्रक्रियेनंतर ही शिफारस मागे घेण्यात आल्याने ज्वालाचा खेळण्याचा मार्ग मोकळा झाला. मिश्र दुहेरीत अश्विनी-तरुण जोडीने जर्मनीच्या जोहान्स शूटलर आणि जोहन्ना गोलिझवेस्की जोडीला २२-२०, २१-१७ असे नमवले.
पुरुषांमध्ये पाचव्या मानांकित जपानच्या केनिची टागोने श्रीकांतचा २१-१०, २१-११ असा धुव्वा उडवला. जपानच्याच ताकुमा उइडाने गुरुसाईदत्तवर २१-११, २१-११ अशी मात केली.