पहिल्या महाकबड्डीची तारांकित कबड्डीपटू नेहा घाडगेचा सवाल

प्रशांत केणी, जयपूर

भारतीय रेल्वे माझे पोट भरते आणि महाराष्ट्रात मी जन्मले, परंतु तरीही गोव्यातून खेळावे लागत आहे. मी एकटी गोव्याला उपांत्यपूर्व फेरीपर्यंत नेऊ शकते, तर महाराष्ट्रासाठीसुद्धा जीवापाड खेळून यश मिळवून देऊ शकते, हे सांगताना पुण्याच्या नेहा घाडगेच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास दिसत होता.

चार वर्षांपूर्वी झालेल्या पहिल्यावहिल्या महाकबड्डी स्पर्धेसाठी नेहाला सर्वाधिक दोन लाख ३८ हजार रुपयांची बोली लागली होती. रेल्वेत नोकरी करणाऱ्या नेहाला अंतिम १२ खेळाडूंमध्ये स्थान मिळाले नाही म्हणून तिने ‘ना हरकत प्रमाणपत्र’ घेऊन गोव्याकडून खेळण्याचा निर्णय घेतला. परंतु देशातील अन्य राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रानेही आपले नियम बदलून रेल्वेच्या अतिरिक्त खेळाडूंना संधी द्यावी, अशी खंत नेहाने बोलून दाखवली.

गोव्याच्या संघात हरयाणाच्या तीन आणि हिमाचलच्या एका खेळाडूचा समावेश आहे. गोव्याने साखळीत हिमाचल प्रदेश, पुडीचेरी आणि उत्तराखंडला टक्कर दिली आणि राष्ट्रीय कबड्डीच्या इतिहासात प्रथमच बाद फेरी गाठली. मग उपउपांत्यपूर्व सामन्यात चंदिगढला नमवले. परंतु रेल्वेकडून पराभवामुळे गोव्याचे आव्हान संपुष्टात आले. दुसरीकडे महाराष्ट्राच्या मुलींचा संघ सलग दुसऱ्या वर्षी साखळीतच गारद झाला. त्यामुळे गोव्याला राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी होता येईल. पण महाराष्ट्राला खेळता येणार नाही. या संदर्भात नेहा म्हणाली, ‘‘स्वत:च्या राज्याकडून खेळायला मला आवडलेच असते. मला बिहार आणि गोव्याकडून खेळण्यासाठी विचारणा झाली. देशाकडून खेळण्याचे माझेही स्वप्न आहे. त्यामुळे रेल्वेची परवानगी घेऊन मी खेळले.’’

२६ वर्षीय नेहा पुण्याच्या राजमाता जिजाऊ संघाची. राजा ढमढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली तिने कबड्डीची कारकीर्द सुरू केली. परंतु गोव्याचे प्रतिनिधित्व करीत असल्यामुळे तिला राज्यातील स्थानिक कबड्डीलाही मुकावे लागणार आहे.