मुंबई : नियमातील बदलांमुळे कबड्डी या खेळाला गती मिळाली. त्यामुळे आता हा खेळ अधिक प्रेक्षणीय झाला आहे, असे उद्गार ज्येष्ठ महिला कबड्डी खेळाडू हिरा तिरोडकर यांनी काढले. सिंहगड मंडळाच्या यजमानपदाखाली ग्रँट रोड येथे आयोजित केलेल्या ओम कबड्डी प्रबोधिनीच्या वर्धापन दिनानिमित्त तिरोडकर यांच्यासह मंदा परब, अमर पवार आणि केशरीनाथ पवार यांना ज्येष्ठ खेळाडू पुरस्काराने गौरवण्यात आले.

‘‘पूर्वी महिलांना पुरुष खेळाडूंएवढय़ा नोकऱ्या मिळत नव्हत्या. उलट लोकांची कुजकट बोलणी ऐकावी लागत असत,’’ असे तिरोडकर यांनी सांगितले. त्यानंतर मंदा परब म्हणाल्या, ‘‘आम्ही शासनाच्या पुरस्कारापासून वंचित राहिलो; परंतु पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण यांच्याशी बोलण्याचे आणि भोजनाचे भाग्य आम्हाला लाभले. यातच आमच्या खेळाचे सार्थक झाले असे मला वाटते.’’

केसरीनाथ म्हणाले की, ‘‘आज कबड्डीला मिळालेल्या या दिवसांचे श्रेय मी बुवा साळवी, त्यांचे सर्व सहकारी आणि वेगवेगळ्या आस्थापनांतून खेळाडूंना नोकरी उपलब्ध करून देणाऱ्या व्यक्तींना देतो. हुतुतू-कबड्डीच्या वादात बुवांना खंदे सहकारी मिळाले. त्यामुळेच तर या खेळाचा प्रसार व प्रचार ‘एशियाड’पर्यंत होऊ  शकला.’’