ऑस्ट्रेलियाच्या काही खेळाडूंनी केलेले कृत्य खरोखरीच खेळास काळिमा फासणारे आहे. मात्र ही घटना आता जुनी झाली आहे. युवा खेळाडूंनी हा कटू भूतकाळ विसरून त्यापासून बोध घ्यावा व भविष्याचा विचार करावा, असे ज्येष्ठ क्रिकेटपटू कपिलदेव यांनी सांगितले.

ऑक्सफर्ड क्लब येथे झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील गोल्फ स्पर्धेत ते सहभागी झाले होते. स्पर्धेनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले, खेळात अशा घटना होत असतात. त्यामुळेच युवा खेळाडूंनी अन्य खेळाडूंनी केलेल्या चुका कशा टाळता येतील. अशा प्रसंगापासून आपल्याला काय बोध मिळतो याचा विचार केला पाहिजे. युवा खेळाडूंसाठी आयपीएल हे उत्तम व्यासपीठ असल्यामुळे युवा खेळाडूंनी या स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी कशी करता येईल याकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे. करीअर करताना नेहमी सकारात्मक दृष्टिकोन व वृत्ती ठेवली पाहिजे.

पाकिस्तानचा शाहीद आफ्रिदी याने भारतव्याप्त काश्मीरमध्ये मारले गेलेले तरुण दहशतवादी नसून सामान्य नागरिक होते. संयुक्त राष्ट्र संघाने याबाबत मध्यस्थी करावी असे विधान केले होते. त्याबाबत विचारले असता कपिलदेव म्हणाले, आफ्रिदीला पाकिस्तानच्या प्रसारमाध्यमांनी विनाकारण मोठे केले आहे. आपण त्याला प्रसिद्धी न देणेच चांगले होईल.