कोहली-रोहित वादावर कपिल देव यांची प्रतिक्रिया

कोलकाता : कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांच्यात मैदानाबाहेर मतभेद असले तरी त्यामुळे फारसा फरक पडत नाही. मैदानावर दोघांनीही चांगली कामगिरी केली आहे, असे मत भारताचे माजी कर्णधार कपिलदेव यांनी व्यक्त केले.

विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आल्यानंतर कोहली आणि शर्मा यांच्यात मतभेद असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण वेस्ट इंडिजविरुद्धच्या दौऱ्यापूर्वी रवाना होण्याआधी कोहलीने या चर्चा हास्यास्पद असल्याचे स्पष्टीकरण दिले होते. आमच्यात मतभेद असते तर भारताने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत घवघवीत यश संपादन केले नसते, असे कोहलीने स्पष्ट केले होते. याविषयी कपिल यांना विचारले असता त्यांनी प्रसारमाध्यमांवरच अप्रत्यक्ष टीका केली.

‘‘मैदानाबाहेर दोघांमध्ये मतभेद असू शकतात. मात्र मैदानावर दोघे कशी कामगिरी करतात, यावर त्या मतभेदांना थारा उरत नाही. प्रत्येकाने दोघांची मैदानावरील कामगिरी लक्षात घेतली पाहिजे. मैदानाबाहेर दोघांचीही विचारसरणी तसेच दृष्टिकोन वेगळा असू शकतो. प्रसारमाध्यमांनीही या गोष्टीचे अधिक जबाबदारीने वृत्तांकन करण्याची गरज आहे. प्रसारमाध्यमेच अशाप्रकारच्या वावडय़ा उठवण्यात थोडय़ाफार प्रमाणात पुढे असतात,’’ असेही त्यांनी सांगितले.