30 May 2020

News Flash

खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा : महाराष्ट्राची पदकांची शंभरी पार

राज्यातील खेळाडूंची सोनेरी कामगिरी सुरूच आहे. सोमवारी पदकतालिकेत महाराष्ट्राला मागे टाकले होते

राज्यातील खेळाडूंची सोनेरी कामगिरी सुरूच; पूजाला तिसरे सुवर्णपदक 

महाराष्ट्राच्या खेळाडूंनी ‘खेलो इंडिया’ युवा क्रीडा स्पर्धेत पाचव्या दिवशी एकूण पदकांची (१०७ पदके) शंभरी पार केली. महाराष्ट्राने आतापर्यंत २६ सुवर्ण, ३१ रौप्य आणि ५० कांस्यपदके पटकावली आहेत.

याबरोबरच राज्यातील खेळाडूंची सोनेरी कामगिरी सुरूच आहे. सोमवारी पदकतालिकेत महाराष्ट्राला मागे टाकले होते. पण मंगळवारी राज्यातील खेळाडूंनी दणदणीत कामगिरी करत हरयाणाला बरेच मागे टाकले. हरयाणा २१ सुवर्णासह  दुसऱ्या स्थानी आहे. सायकलिंगसह अ‍ॅथलेटिक्स, गोळाफेक, नेमबाजी, जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राने सुवर्णपदके पटकावली.

गोळाफेक : पूर्णा रावराणेला सुवर्ण

पूर्वा रावराणे हिने (२१ वर्षांखालील) गोळाफेक प्रकारात सुवर्णपदक पटकावताना स्पर्धा विक्रम नोंदवला. तिने १४.५७ मीटपर्यंत गोळाफेक केली. पूर्णाचे हे खेलो इंडियामधील दुसरे पदक ठरले. तिने गेल्या वर्षी अनामिका दास हिने नोंदवलेला १४.१० मीटरचा विक्रम मोडीत काढला. पूर्णा ही दहिसरच्या विद्याप्रसारक मंडळात हिरेन जोशी आणि संतोष आंब्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे.

सायकलिंग : सांघिक प्रकारात दोन सुवर्णपदके

महाराष्ट्राच्या सायकलपटूंनी यंदा पदकांची दणदणीत कमाई केली. पूजा दानोळेने सलग तिसरे सुवर्णपदक पटकवले. तिने पाच किलोमीटरची स्क्रॅच शर्यत ८ मिनिटे ४४.७० सेकंद वेळेत जिंकली. पूजाला स्प्रिंट प्रकारात (१७ वर्षांखालील गटात) आदिती डोंगरेसह कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. सांघिक स्प्रिंट प्रकारात (२१ वर्षांखालील) मुलांमध्ये अभिषेक काशिद, मयूर पवार, अश्विन पाटील यांनी सुवर्णपदक मिळविले. मुलींच्या स्प्रिंट सांघिक प्रकारात शशिकला आगाशे आणि मयूरी लुटे यांनी ४९.७३६ सेकंद वेळेसह सुवर्णपदक पटकावले.

नेमबाजी : हर्षवर्धनला सुवर्ण

नेमबाजीत २५ मीटर रॅपिड फायर प्रकारात पुण्याच्या हर्षवर्धन यादवने पात्रता फेरीतील चुका सुधारून अंतिम फेरीत सरस कामगिरी करताना (२१ वर्षांखालील) सुवर्णपदक मिळवले.

ज्युडो : संपदाला रौप्य

संपदा फाळकेला ज्युडोमध्ये (२१ वर्षांखालील) ७८ पेक्षा कमी किलो वजन प्रकारात रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

अ‍ॅथलेटिक्स : कीर्ती भोईटेला सुवर्णपदक

कीर्ती भोईटेने (२१ वर्षांखालील) मुलींच्या २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक जिंकले.  स्नेहा जाधवने हातोडाफेकीत रौप्यपदक मिळवले.

जिम्नॅस्टिक : राज्याचा दबदबा कायम

महाराष्ट्राने अपेक्षेप्रमाणे जिम्नॅस्टिक्समध्ये सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. आदिती दांडेकरने लयबद्ध विभागात हूप आणि क्लब प्रकारात सोनेरी कामगिरी केली. तसेच तिने चेंडू प्रकारात रौप्यपदक तर रिबन प्रकारात कांस्य मिळवले. रिचा चोरडियाने हूप आणि चेंडू प्रकारात कांस्य जिंकले.

टेबल टेनिस : तीन रौप्यपके

रिगान अलबुकर्क, सृष्टी हेलंगडी आणि हृषिकेश मल्होत्रा यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2020 1:45 am

Web Title: khelo india youth sports tournament akp 94
Next Stories
1 रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा : अनिर्णीत सामन्यात मुंबईला तीन गुण
2 होबार्ट खुली टेनिस स्पर्धा : सानियाचे यशस्वी पुनरागमन
3 बेंगळूरुला जाण्याचा निर्णय पूर्णपणे सायनाचा!
Just Now!
X