अव्वल बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांत आणि आशियाई स्पध्रेतील माजी सुवर्णपदक विजेता टेनिसपटू सोमदेव देववर्मन यांना मंगळवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नवी दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात हा सोहळा पार पडला. त्यांच्यासह पॅरालिम्पिक स्पध्रेत भारताला पहिले सुवर्णपदक जिंकून देणारे मुर्लीकांत पेटकर यांनाही या पुरस्काराने गौरविण्यात आले.

यंदाच्या वर्षांत भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि स्नूकर व बिलियर्ड्समधील विश्वविजेता पंकज अडवाणी यांना पद्मभुषण, तर २०१७च्या जागतिक वेटलिफ्टिंग स्पध्रेत ४८ किलो वजनी गटातील विजेत्या सैखोम मिराबाई चानूला पद्मश्री जाहीर झाला आहे. मात्र, हे तिघेही विविध कारणास्तव या सोहळय़ात उपस्थित राहू शकले नाही.

बॅडमिंटनच्या जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या किदम्बीने गत हंगामात चार सुपर सीरिज जेतेपदांसह एकूण सहा स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला आहे.