विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा उत्साह संपत नाही, तोच आता आयपीएल स्पर्धेच्या हंगामास प्रारंभ होत आहे. या स्पर्धेसाठी किंग्ज इलेव्हन पंजाबच्या सरावालर गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर प्रशिक्षक संजय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी प्रारंभ झाला.
या संघातील ब्युरेन हेंड्रिक्स, परविंदर अवाना, रिद्धिमान साहा, अनुरित सिंग, शार्दूल ठाकूर, शिवम शर्मा, योगेश गोवळकर यांनी सरावात भाग घेतला. वीरेंद्र सेहवाग, मनन व्होरा, मुरली विजय व अन्य आंतरराष्ट्रीय खेळाडू एक-दोन दिवसात येथील शिबिरात सहभागी होणार आहेत. बांगर यांना आर. श्रीधर (क्षेत्ररक्षण प्रशिक्षक), जो डेवेस (गोलंदाजीचे प्रशिक्षक) यांचे सहकार्य लाभले आहे.
‘‘अनुभवी व युवा खेळाडूंच्या समावेशामुळे आमचा संघ अतिशय समतोल झाला आहे. गतवर्षी आमची कामगिरी चांगली झाली होती. यंदाही तीच मालिका पुढे ठेवण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत,’’ असे बांगर यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, ‘‘संघाच्या सराव शिबिरासाठी सर्वच सहयोगींचे सकारात्मक सहकार्य मिळत आहे. येथील वातावरण व खेळपट्टी याच्याशी अनुरूप होण्यासाठीच हे शिबिर आम्ही घेतले आहे. खेळाडूंची तंदुरुस्ती व क्षमता यावर आम्ही भर देत आहोत. ज्या ठिकाणी आमचे खेळाडू कमी पडतात, त्या उणिवा दूर करण्यासाठी हे शिबिर उपयोगी पडणार आहे.’’
किंग्ज इलेव्हनचे मुख्य कार्यपालन अधिकारी फ्रेझर कॅस्टेलिनो यांनी सांगितले, ‘‘पुण्यात क्रिकेटसाठी अतिशय उत्साहवर्धक वातावरण असते, त्याचा फायदा आमच्या खेळाडूंना मिळेल अशी खात्री वाटल्यामुळेच आम्ही यंदा तीन सामने येथे खेळणार आहोत. गतवर्षीप्रमाणेच यंदाही या स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न आमचे खेळाडू करतील अशी मला खात्री आहे.’’
दरम्यान, येथे होणाऱ्या तीन सामन्यांसाठी डेक्कन जिमखाना व गहुंजे येथील स्टेडियमवर तिकीट विक्रीसाठी स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आले आहेत.