मायकेल होल्डिंग यांचा सल्ला

माजी महान क्रिकेटपटू सर व्हिव्हियन रिचर्ड्स यांच्याप्रमाणे भारताचा कर्णधार विराट कोहलीने संयम बाळगायला शिकावे, असा सल्ला वेस्ट इंडिजचे माजी वेगवान गोलंदाज मायकेल होल्डिंग यांनी दिला आहे. रिचर्ड्स आणि कोहली यांच्यात अनेक गोष्टींमध्ये साम्य असल्याचे त्यांना वाटते.

‘‘विराट हा तरुण कर्णधार आहे. नेतृत्वातील बारकावे तो शिकतो आहे. मैदानावर कधी तो अधिक आक्रमक होतो तर कधी अधिकच भावनिक होतो. त्याचे वागणे प्रतिस्पर्धी संघासह त्याच्या सहकाऱ्यांनाही बुचकळय़ात टाकणारे असते. त्याचे आक्रमक वागणेही चक्रावणारे आहे,’’ असे होल्डिंग यांनी म्हटले.

‘‘रिचर्ड्स यांच्याशी कोहलीची तुलना केवळ फलंदाजीमध्ये नाही तर नेतृत्वाबाबतही करतो,’’ असे होल्डिंग यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘कर्णधारपद भूषवताना कोहली हा रिचर्ड्स यांच्याप्रमाणे भासतो. रिचर्ड्स यांनी नेतृत्व स्वीकारले त्या वेळी तेही आक्रमक होते. त्यानंतर ते संयमी झाले. कर्णधाराचे अनुकरण अन्य सहकाऱ्यांनी केले. तद्नंतर वेस्ट इंडिजची सांघिक कामगिरी किती उंचावली, हे सर्वाना ठाऊक आहे. विराटबाबतही तसेच घडत आहे. अनुभव गाठीशी येईल, तसा विराट शांत होईल.’’

तिसरी आणि अंतिम कसोटी जिंकून भारताने शेवट गोड केला तरी दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका १-२ अशी गमवावी लागली. पहिल्या दोन कसोटीसाठीच्या अंतिम संघनिवडीवरून  कोहलीवर टीका झाली. प्रत्येक कसोटीमध्ये संघबदल करण्याचा त्याचा निर्णयही होल्डिंग यांना पटलेला नाही. ‘‘प्रत्येक संघाला वेगवेगळय़ा वातावरणामध्ये आणि वेगवेगळय़ा खेळपट्टय़ांवर खेळावे लागते. खेळपट्टय़ांचा रागरंग पाहता अमुक हा क्रिकेटपटू अंतिम निवडीसाठी पात्र आहे. सद्य:स्थितीत खूप क्रिकेट खेळले जात असल्याने खेळाडूंना  विशेषकरून गोलंदाजांना विश्रांती मिळण्याच्या दृष्टीने बदल आवश्यक आहे. त्यामुळे विराटचा बदलांवर अधिक भर आहे. मात्र वारंवार बदल घातक ठरतो. यापूर्वीच्या कसोटीतील सवरेत्कृष्ट संघांचा अभ्यास केल्यास त्यांनी प्रत्येक सामन्यागणिक बदल केलेले नाहीत, असे दिसून येते. प्रत्येक क्रिकेटपटूला स्थिरावण्यासाठी थोडा अवधी देण्याची आवश्यकता आहे,’’ असे होल्डिंग म्हणाले.

बुमरा इंग्लंडमध्ये प्रभावी ठरणार नाही 

दक्षिण आफ्रिकेच्या खेळपट्टीवर भारताचा द्रुतगती गोलंदाज जसप्रीत बुमरा याचा प्रभाव चालत असला तरीही इंग्लंडमधील हवामान व खेळपट्टीवर त्याचा प्रभाव पडणार नाही, असे वेस्ट इंडिजचे ज्येष्ठ तेज गोलंदाज मायकेल होल्डिंग यांनी सांगितले.

होल्डिंग म्हणाले, नवीन चेंडूवर महत्त्वाचे बळी घेण्याइतकी शैली बुमराकडे नाही. उजव्या हाताने फलंदाजी करणाऱ्यांविरुद्ध तो अपेक्षेइतकी प्रभावी कामगिरी करू शकत नाही. नवीन चेंडूवर गोलंदाजी करण्याबाबत मी भुवनेश्वरकुमारला प्राधान्य देईन. त्यानंतर इशांत शर्मा व महंमद शमी यांचा क्रम असेल. इंग्लंडमधील खेळपट्टय़ा आफ्रिकेतील खेळपट्टय़ांच्या तुलनेत खूपच वेगळय़ा आहेत. तेथे यष्टीबाहेर चेंडू टाकण्यात अनुभवी असलेल्या गोलंदाजास चांगले यश मिळत असते.

बुमराने आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीतील एकाच डावात पाच गडी बाद करण्याची कामगिरी केली होती. त्याबाबत होल्डिंग यांनी सांगितले, तो तेथे यशस्वी ठरला असला तरीही त्याच्या गोलंदाजीत अजून भरपूर परिपक्वता येण्याची गरज आहे. द्रुतगती गोलंदाजीस पोषक खेळपट्टीवर तो यशस्वी होईल, मात्र अन्य खेळपट्टय़ांवर त्याची मात्रा चालणार नाही. फलंदाजीस अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर प्रभावी मारा करण्याची क्षमता असलेले अव्वल दर्जाच्या द्रुतगती गोलंदाजांची भारताकडे कमतरता नाही. आफ्रिकेविरुद्ध भारतीय गोलंदाजांनी समाधानकारक कामगिरी केली. मात्र रविचंद्रन अश्विन याने खूप निराशा केली. त्याने टप्पा व दिशा ओळखून त्यानुसार गोलंदाजी करणे अपेक्षित होते. अर्थात, येथील अनुभवापासून त्याला खूप काही शिकावयास मिळाले आहे. भारताला पहिल्या दोन कसोटींमध्ये पराभव स्वीकारावा लागला ते प्रामुख्याने फलंदाजांच्या खराब कामगिरीमुळेच.