२०१७ हे वर्ष भारतीय बॅडमिंटनपटूंसाठी सर्वात यशस्वी वर्ष मानलं जातंय. महिला एकेरीत पी. व्ही. सिंधू, सायना नेहवाल, पुरुष एकेरीत किदम्बी श्रीकांत, परुपल्ली कश्यप, साईप्रणीत, प्रणॉय, समीर वर्मा या खेळाडूंनी आपला ठसा आंतराष्ट्रीय पातळीवर उमटवला आहे. कोरियन ओपन सुपर सिरीज स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताच्या पी. व्ही. सिंधूने जपानच्या ओकुहाराचा पराभव केला. या पराभवासह सिंधूने अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत झालेल्या पराभवाचा वचपा काढला. मात्र या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करुन सिंधूने आणखी एक विक्रम भारताच्या नावे केला आहे.

कोरियन ओपनच्या उपांत्य फेरीत सिंधूने हि बिंगीजाओचा २१-१०, १७-२१, २१-१६ असा पराभव करत स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. यासह सुपर सिरीज स्पर्धांच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारा भारत हा सर्वात पहिल्या क्रमांकाचा देश ठरला आहे. २०१७ या वर्षात भारताचे ६ खेळाडू वेगवेगळ्या सुपर सिरीज स्पर्धांच्या अंतिम फेरीत पोहचले आहेत. या यादीत भारताने जपान, चीन यासारख्या मातब्बर देशांनाही मागे टाकलंय.

अवश्य वाचा – कोरिया ओपन सुपर सीरिज: अंतिम सामन्यात सिंधू विजयी

एप्रिल २०१७ मध्ये सिंधूने इंडिया ओपन स्पर्धेचं विजेतेपद पटकावत भारताला चांगली सुरुवात करुन दिली होती. या स्पर्धेत तिने रिओ ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती कॅरोलिना मरिनचा पराभव केला होता. यानंतर पुरुषांमध्ये किदम्बी श्रीकांत आणि साई प्रणीत या खेळाडूंनी अंतिम फेरी गाठली होती. श्रीकांतने इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलिया ओपन सुपर सिरीजचं विजेतेपद पटकावलं होतं.

काही दिवसांपू्र्वीच पार पडलेल्या बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सिंधूला अंतिम फेरीत जपानच्या ओकुहाराकडून पराभव स्विकारावा लागला होता. मात्र त्या पराभवाचा कोरियन ओपन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बदला घेत सिंधूने कोरियन ओपन सुपर सिरीज स्पर्धेत भारताचा तिरंगा डौलाने फडकावला.