भारतीय क्रिकेट संघाचा चायनामन फिरकीपटू कुलदीप यादवने माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीबाबत प्रतिक्रिया दिली आहे. कुलदीप यादवने इंडियन एक्सप्रेसशी संवाद साधला. मैदानात यष्ट्यांच्या मागून धोनीच्या मिळणाऱ्या मार्गदर्शनाची आठवण येते, असे कुलदीपने सांगितले. धोनीने मागील वर्षी १५ ऑगस्टला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

कुलदीपने म्हणाला, “कधीकधी मला माही भाईच्या मार्गदर्शनाची आठवण येते, कारण त्यांच्याकडे खूप अनुभव होता. ते सतत आम्हाला ओरडत विकेटच्या मागून मार्गदर्शन करायचे. आम्हाला त्यांची आठवण येते. ऋषभ पंत आता त्यांच्या जागी आहे. तो जितका खेळेल, तितका तो आम्हाला भविष्यात अधिक इनपुट देण्यास सक्षम असेल. मला नेहमीच असे वाटते, की प्रत्येक गोलंदाजाला अशा पार्टनरची आवश्यकता असते, जो खेळपट्टीच्या दुसऱ्या बाजूने प्रतिसाद देईल.”

 

कुलदीपने २०१९मध्ये २३ एकदिवसीय सामने खेळले होते, तर २०२० आणि २०२१मध्ये त्याने आतापर्यंत फक्त ७ एकदिवसीय सामने खेळले आहेत. धोनीने १५ ऑगस्ट २०२० रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. जुलै २०१९मध्ये त्याने शेवटचा सामना खेळला.

कुलदीप म्हणाला, “जेव्हा माही भाई संघात होते, तेव्हा मी व युजवेंद्र चहल खेळत होतो. माही भाई गेल्याने चहल आणि मी एकत्र सामने खेळलेलो नाही. मला फक्त काही सामने खेळण्याची संधी मिळाली. मी १० सामने खेळले, ज्यात मी हॅट्ट्रिकही घेतली. जर तुम्ही माझ्या कामगिरीकडे पाहिले तर माझी कामगिरी चांगली होती.”