लंडन : श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराची मेरिलिबोन क्रिकेट क्लबचा (एमसीसी) पहिला ब्रिटिशेतर अध्यक्ष म्हणून घोषणा झाली आहे. एक वर्षांचा कार्यकाळ असलेल्या या पदावर तो १ ऑक्टोबर, २०१९पासून कार्यरत होईल. लॉर्ड्स येथे बुधवारी झालेल्या ‘एमसीसी’च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सध्याचे अध्यक्ष अ‍ॅन्थनी व्रेफोर्ड यांनी संगकाराच्या नामांकनाची घोषणा केली.

‘‘एमसीसीचे क्रिकेटजगतील स्थान फार मोठे आहे. क्रिकेटसाठी, विशेषत: लॉर्ड्ससाठी २०२० हे वर्ष अतिशय महत्त्वाचे आहे. त्यामुळे एमसीसीचे पुढील अध्यक्षपद मिळणे, हे माझ्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे,’’ असे संगकाराने सांगितले.

संगकाराचे ‘एमसीसी’शी नाते आधीपासून जोडले आहे. २०११मध्ये कॉलिन काऊड्रे व्याख्यानमालेत संगकाराने भाषण केले होते. या व्याख्यानात त्याने श्रीलंकेतील युद्धजन्य स्थिती आणि २००९मध्ये लाहोर येथे केलेला अतिरेक्यांचा हल्ला यासंदर्भात क्रिकेटचे महत्त्व विशद केले होते. २०१२मध्ये संगकाराला ‘एमसीसी’ने सन्माननीय आजीवन सदस्यत्व बहाल केले. याच वर्षी त्याचा ‘एमसीसी’च्या जागतिक क्रिकेट समितीवर समावेश करण्यात आला.