श्रीलंकेचे माजी क्रीडामंत्री महिंदानंद अलुथगमगे यांनी काही दिवसांपूर्वी स्थानिक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, २०११ विश्वचषकाचा अंतिम सामना फिक्स होता असा आरोप केला होता. या आरोपांनंतर श्रीलंकन क्रिकेटमध्ये वादळ निर्माण झालं होतं. श्रीलंकन सरकारनेही प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन अलुथगमगे यांनी केलेल्या आरोपांविषयी चौकशी सुरु केली. मात्र पुरेशा पुराव्याअभावी श्रीलंकन पोलिसांनी हा तपास ३ जुलैला बंद केला.

या प्रकरणात लंकेचा तत्कालीन संघातील कर्णधार कुमार संगकारा, अनुभवी खेळाडू महेला जयवर्धने, उपुल थरंगा आणि तत्कालीन निवड समिती अध्यक्ष अरविंदा डी सिल्वा यांची चौकशी करण्यात आली होती. पण सबळ पुरावे नसल्याने हा तपास बंद करावा लागला होता. घडलेल्या प्रकाराबाबत संगाकाराने क्रिकबझशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या. “माजी क्रीडामंत्र्यांनी विश्वचषकासारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेबाबत प्रश्न उपस्थित केले आणि त्यामुळे आम्हाला गुन्हेगारासारखं पोलिसांच्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागली. अशाप्रकारे चौकशीला सामोरं जाणं हे खूपच क्लेशदायक होतं”, असे संगाकारा म्हणाला.

२०११ विश्वचषक विजेता भारतीय संघ

“अशाप्रकारे प्रश्नांची उत्तर देताना आम्हाला वाईट वाटत होतं. पण एका अर्थी आरोप केला गेला ते चांगलंच झालं. त्यामुळे खेळाबद्दलही तपास झाला आणि त्यातून खरं काय ते समोर आलं. खेळावर प्रश्न उपस्थित करणारे नेहमीच असावेत. त्याचबरोबर तुम्हालाही उपस्थित प्रश्नांची खरी उत्तरं देणं जमलं पाहिजे. मी असो, महेला असो किंवा सिलेक्टर्स असो… आम्ही जे विचारलं ते खरं खरं सांगितलं. या चौकशीतून खेळाबद्दल प्रत्येकालाच योग्य तो संदेश मिळाला आणि खेळाबद्दलचा विश्वास दुणावला”, असेही त्याने नमूद केले.