बॉल टॅम्परिंग प्रकरणात वर्षभराच्या बंदीची शिक्षा भोगत असलेल्या डेव्हिड वॉर्नरने आयपीएलमध्ये सनराईजर्स हैदराबाद संघाच्या कर्णधारपदाचाही राजीनामा दिला. यानंतर आयपीएलमध्ये वॉर्नरची जागा कोण घेणार यावर बराच उहापोह सुरु झाला. काही दिवसांपूर्वी आलेल्या बातमीनुसार, हैदराबादचं संघ व्यवस्थापन श्रीलंकेच्या कुशल परेराला संघात घेण्यासाठी उत्सुक असल्याचं समोर आलं होतं. मात्र मिळालेल्या माहितीनुसार, कुशल परेराने आयपीएलमध्ये खेळण्यासाठी आपला नकार दर्शवला आहे.

डेव्हिड वॉर्नरऐवजी आयपीएलमध्ये खेळण्यासाठी कुशल परेराने श्रीलंकेच्या स्थानिक क्रिकेटमध्ये खेळण्यास पसंती दर्शवली असल्याचं समजतंय. आयपीएलऐवजी श्रीलंकेच्या कसोटी संघात आपली जागा पक्की करण्यासाठी परेराने आयपीएल न खेळण्याचा निर्णय घेतल्याचं समजतंय. २०१६ साली कुशल परेराने श्रीलंकेकडून शेवटचा कसोटी सामना खेळला होता. यानंतर त्याला लंकेच्या कसोटी संघात जागा मिळवता आलेली नाहीये. त्यामुळे कुशलने घेतलेल्या निर्णयाचं सर्व स्तरातून कौतुक केलं जातंय.

डेव्हिड वॉर्नरच्या अनुपस्थितीत हैदराबादच्या संघ व्यवस्थापनाने न्यूझीलंडच्या केन विल्यमसनकडे संघाचं कर्णधारपद सोपवलं आहे. मात्र डेव्हि़ड वॉर्नरच्या ऐवजी संघात नेमक्या कोणत्या खेळाडूला जागा द्यायची हा पेच हैदराबादसमोर कायम आहे. सध्या हैदराबादसमोर जो रुट, हाशिम आणला आणि मार्टीन गप्टील यांच्यासारखे पर्याय शिल्लक आहेत.

अवश्य वाचा – IPl 2018 – डेव्हिड वॉर्नरचा उत्तराधिकारी ठरला, न्यूझीलंडचा केन विलियमसन हैदराबादचा कर्णधार