वणवाग्रस्तांसाठी क्रिकेट सामना

ऑस्ट्रेलियामधील वणवाग्रस्तांच्या मदतीसाठी रविवारी झालेल्या मदतनिधी सामन्यात ब्रायन लाराने चमकदार नाबाद ३० धावा केल्या.

मेलबर्नच्या जंक्शन ओव्हल मैदानावर झालेल्या सामन्यात वेस्ट इंडिजचा महान फलंदाज लाराने कव्हर ड्राइव्हज आणि स्ट्रेट ड्राइव्ह्जच्या फटक्यांनी चाहत्यांची मने जिंकली. त्याच्या खेळीत दोन षटकारांचा समावेश होता. अन्य फलंदाजाला संधी देण्यासाठी त्याने डाव सोडला. जस्टिन लँगर बाद झाल्यानंतर कर्णधार रिकी पाँटिंग फलंदाजीला उतरला. त्यानेही २६ धावा केल्या. त्यामुळे पाँटिंग संघाने १० षटकांत ५ बाद १०४ धावा केल्या.त्यानंतर प्रत्युत्तरात कर्णधार अ‍ॅडम गिलख्रिस्टने पहिल्याच चेंडूवर षटकार खेचला. मग शेन वॉटसनने नऊ चेंडूंत ३० धावा केल्या. त्याने वसिम अक्रमच्या गोलंदाजीवर तुफानी हल्ला चढवला. मात्र तरीही पाँटिंग संघाने गिलख्रिस्ट संघावर एक धावेने रोमहर्षक विजय मिळवला.

या सामन्यानंतर ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ने ‘ट्विटर’वर पोस्ट केले की, ‘‘ऑस्ट्रेलिया आणि जगभरातील क्रिकेटपटूंनी वणवाग्रस्तांच्या कुटुंबीयांसाठी झालेल्या मदतनिधी सामन्यात खेळून ७७ लाख ऑस्ट्रेलियन डॉलर्स रुपये जमा केले.’’