जागतिक स्तरावर चमकणाऱ्या भारतीय बॅडमिंटनपटूंना आता चांगले दिवस आले आहेत, असे म्हणावे लागेल. सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू यांच्यापाठोपाठ आता भारतीय बॅडमिंटनपटूंना करारबद्ध करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कंपन्या पुढे सरसावल्या आहेत. ली निंग या चीनमधील क्रीडा साहित्याचे उत्पादन करणाऱ्या कंपनीने अव्वल बॅडमिंटनपटू के. श्रीकांत आणि अरुंधती पनतावणे हिला करारबद्ध केले असून या यादीत लवकरच आरएमव्ही गुरुसाईदत्तसह अनेक बॅडमिंटनपटूंची भर पडणार आहे.
योनेक्स व ली निंग या क्रीडासाहित्य पुरवणाऱ्या कंपन्यांमध्ये जबरदस्त स्पर्धा आहे. या दोन्ही कंपन्यांनी भारतीय खेळाडूंना करारबद्ध करण्यास सुरुवात केल्यामुळे खेळाडूंना आर्थिक पाठबळ मिळणार आहे. गेल्या वर्षी थायलंड खुली ग्रां. प्रि. सुवर्ण बॅडमिंटन स्पर्धा जिंकणाऱ्या श्रीकांतला ली निंगने करारबद्ध करून घेतले आहे. भारताबाहेर जाऊन ग्रां. प्रि. स्पर्धा जिंकणारा तो पहिला भारतीय बॅडमिंटनपटू ठरला होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर चमक दाखवणाऱ्या श्रीकांतची गेल्या वर्षांतील कामगिरी चांगली झाली होती.
‘स्पोर्टी सोल्यूशन्स’ या खेळाडूंचे व्यवस्थापन पाहणाऱ्या कंपनीने ली निंगशी करार करताना मध्यस्थ म्हणून काम पाहिले आहे. पण कराराची रक्कम उघड करण्यास मात्र स्पोर्टी सोल्यूशन्सने नकार दिला.