विराट कोहली हा मैदानावर आक्रमकपणे वावरतो आणि त्याच त्वेषाने निर्णय घेतो, हे त्याच्यातील नेतृत्वगुण मला भावतात, असे भारतीय युवा संघाचा कर्णधार विजय झोलने सांगितले. २०११मध्ये १९-वर्षांखालील वयोगटाच्या प्रथम श्रेणी सामन्यात साकारलेल्या नाबाद ४५१ धावांनंतर जालनाच्या विजय झोलने क्रिकेटजगताचे लक्ष वेधले. २०१२च्या युवा विश्वविजेत्या संघाचा उपकर्णधार सांभाळणाऱ्या या गुणी खेळाडूने यंदाच्या क्रिकेट हंगामात भारताच्या युवा संघाचे यशस्वीपणे नेतृत्व केले. याचप्रमाणे रणजी क्रिकेटमध्ये दमदार द्विशतकानिशी त्याने संस्मरणीय पदार्पण केले. महाराष्ट्राला उपविजेतेपद मिळवून देणाऱ्या या प्रवासात झोलने नऊ सामन्यांत एक शतक आणि दोन अर्धशतकांसह ५५३ धावांचे योगदान दिले. आयपीएलच्या सातव्या मोसमात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे प्रतिनिधित्व करणाऱ्या झोलशी केलेली खास बातचीत-
* गेली काही वष्रे तू रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी करारबद्ध आहेस. या संघाकडून खेळताना कोणता अनुभव मिळतो?
विराट कोहली, ख्रिस गेल, ए. बी. डी’व्हिलियर्स, अ‍ॅल्बी मॉर्केल, युवराज सिंग यांच्यासारख्या अनेक दिग्गज खेळाडूंकडून मार्गदर्शनाचे धडे मिळतात. कठीण परिस्थिती ते कसे हाताळतात, हे शिकण्यासारखे असते. कोहलीच्या नेतृत्वातील आक्रमकता आणि निर्णयक्षमता मला भावते.
*   नाशिकमधील ऐतिहासिक खेळीपासून आतापर्यंतचा प्रवास स्वप्नवत वाटतो आहे का?
जालनासारख्या छोटय़ा गावातून कारकीर्द सुरू करताना मी क्रिकेटपटू होण्याचे आणि देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न पाहिले होते. युवराज सिंग, विराट कोहली यांच्यासारख्या अनेक खेळाडूंनी आधी १९ वर्षांखालील (युवा) क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वत:ला सिद्ध केले. त्यानंतर भारताच्या वरिष्ठ संघात आपले स्थान निर्माण केले. त्यांच्या पावलांवर पावले टाकण्याच माझा प्रयत्न राहील. माझ्याकडून सर्वोत्तम कामगिरी मी करीत राहीन.
*   भारतीय युवा संघाच्या नेतृत्वपदाची जबाबदारी सांभाळताना तू काय शिकलास?
बरेच काही शिकलो. भारतीय युवा संघाचे पाच आव्हानांप्रसंगी मी नेतृत्व केले, त्यापैकी चार ठिकाणी आम्ही जिंकलो. युवा विश्वचषक स्पध्रेत आम्ही इंग्लंडकडून हरलो आणि उपांत्यपूर्व फेरीत भारताचे आव्हान संपुष्टात आले. त्यामुळे संमिश्र स्वरूपाच्या भावना होत्या. बऱ्याच खेळाडूंसोबत खेळण्याचा अनुभव गाठीशी होता. या खेळाडूंची बलस्थाने आणि कच्चे दुवे यांची जाणीव होती. आंतरराष्ट्रीय स्तरावर नेतृत्व करताना या साऱ्या गोष्टींचा कस लागला. हा माझ्यासाठी खूप मोठा अनुभव होता.
*  ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्याचा अनुभव कसा होता?
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील वातावरण व वेगवान खेळपट्टय़ा यांचे आव्हान आम्ही सहज पेलले, याचा मला अभिमान वाटतो. जिंकणाऱ्या संघाला नेहमीच चांगला अनुभव मिळतो.
*   रणजी करंडक स्पध्रेत महाराष्ट्राने उपविजेतेपदापर्यंत मजल मारली. या प्रवासाविषयी काय सांगशील?
यंदाच्या हंगामातच मी महाराष्ट्राकडून रणजी पदार्पण केले. त्रिपुराविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात द्विशतक आत्मविश्वास उंचावणारे होते. रणजी हंगामाची चांगली सुरुवात झाली आणि मी संघासाठी या हंगामात चांगले योगदान दिले. महाराष्ट्राने या वर्षी रणजीच्या अंतिम सामन्यापर्यंत धडक मारली. रणजीचा अंतिम सामना खेळण्याचा माझे स्वप्न पहिल्याच हंगामात साकारले. परंतु दुर्दैवाने आम्ही हरलो. अंतिम सामन्यातील पराभवाचा धक्का पचवणे आम्हाला कठीण गेले. परंतु या अनुभवातून आम्ही अधिक परिपक्व होत गेलो. आगामी रणजी हंगामात आमचा ‘अ’ गटात समावेश असेल. त्या गटातसुद्धा आम्ही पराक्रम दाखवू.