बार्सिलोनाची मँचेस्टर सिटीवर ४-० अशी मात; बायर्न म्युनिकचा सोपा विजय

लिओनेल मेस्सीच्या हॅट्ट्रिकच्या जोरावर बार्सिलोना क्लबने प्रशिक्षक पेप गॉर्डिओला यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या मँचेस्टर सिटीचा ४-० असा सहज पराभव केला आणि चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पध्रेत विजयी कूच केली. दुसऱ्या लढतीत बायर्न म्युनिकने ४-१ अशा फरकाने पीएसव्ही क्लबचा पराभव केला.

दुखापतीमुळे तीन आठवडय़ांच्या सक्तीच्या विश्रांतीनंतर मैदानावर उतरलेल्या मेस्सीने १७व्या मिनिटाला बार्सिलोनाला आघाडी मिळवून दिली. गॉर्डिओला यांनी १९९० ते २००१ या कालावधीत बार्सिलोना क्लबचे प्रतिनिधित्व केले, तर २००८ ते २०१२ या कालावधीत ते मार्गदर्शकाच्या भूमिकेत होते. २०१२नंतर पहिल्यांदा कॅम्प नाऊ येथे परतलेल्या गॉर्डिओला यांचे बार्सिलोनाकडून असे स्वागत होईल, हे कोणालाही अपेक्षित नव्हते.

पहिल्या सत्रात सिटीने बार्सिलोनाला एक गोलवरच समाधान मानण्यास भाग पाडले, परंतु मध्यंतरानंतर मेस्सीचा धमाका पुन्हा पाहायला मिळाला. ६१ व ६९ मिनिटाला सलग दोन गोल करून युरोपमधील सलग दुसऱ्या हॅट्ट्रिकची नोंद केली. ८९व्या मिनिटाला त्यात नेयमारने भर घालून बार्सिलोनाचा ४-० असा विजय पक्का केला.  तत्पूर्वी, ८७व्या मिनिटाला पेनल्टी स्पॉट किकवर नेयमारला गोल करण्यात अपयश आले. या विजयाबरोबर बार्सिलोनाने ‘क’ गटात तीन विजयासह अव्वल स्थान कायम राखले आहे. याच गटात बोरुसिया मोइंचेग्लॅडबॅचने सेल्टिकचा २-० असा पराभव करून पहिल्या गुणाची कमाई केली.

इतर निकाल

  • अ गट : आर्सेनल ६ (अ‍ॅलेक्सिस सांचेझ १२ मि., थीओ वॉलकॉट ४२ मि., अ‍ॅलेक्स ऑक्सलेड-कॅम्बेरीयन ४६ मि. , मेसूट ओझील ५६, ८३ व ८७ मि.) वि. वि. लुडोजॉरेट्स ०
  • ड गट : बायर्न म्युनिक ४ (थॉमस म्युलर १३ मि., जोशुआ किमिच २१ मि., रॉबर्ट लेवांडोवस्की ५९ मि. व अर्जेन रॉबेन ८४ मि.) वि. वि. पीएसव्ही १ (ल्युसिआनो नरसिंग ४१ मि.)
  • अ गट : पॅरिस सेंट जर्मेन ३ (एंजल डि मारिया ४० मि., लुकास मौरा ६२ मि. व इडिसन कवानी ९० मि.) वि. वि. बॅसेल ०