15 August 2020

News Flash

चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धा :मेस्सीने बचावभिंत भेदली

‘‘लिओनेल मेस्सीला रोखण्यात मी सक्षम आहे. त्याला एकही गोल करू देणार नाही,’’ सामन्यापूर्वी बायर्न म्युनिचच्या गोलरक्षक मॅन्युएल नेयुएरने केलेल्या या शाब्दिक हल्ल्याला मेस्सीने मैदानावर सडेतोड

| May 8, 2015 12:12 pm

‘‘लिओनेल मेस्सीला रोखण्यात मी सक्षम आहे. त्याला एकही गोल करू देणार नाही,’’ सामन्यापूर्वी बायर्न म्युनिचच्या गोलरक्षक मॅन्युएल नेयुएरने केलेल्या या शाब्दिक हल्ल्याला मेस्सीने मैदानावर सडेतोड उत्तर दिले. सामन्याच्या पूर्वार्धात लुईस सुआरेज आणि डॅनिएल अ‍ॅल्वेस यांच्यासह मेस्सीला मॅन्युएलची बचावभिंत ओलांडण्यात अपयश आले. त्यामुळे मॅन्युएलचे हात आभाळाला टेकले, परंतु उत्तरार्धात मेस्सीने त्याला जमिनीवर आणले. तीन मिनिटांत दोन गोल करून मेस्सीने बार्सिलोनाच्या विजयाचा पाया रचला आणि नेयमारने त्यावर कळस चढवला. बार्सिलोनाने युएफा चॅम्पियन्स लीगच्या उपांत्य फेरीच्या पहिल्या लीग लढतीत ३-० असा विजय मिळवत अंतिम फेरीची दावेदारी भक्कम केली.  
युरोपियन फुटबॉल स्पध्रेच्या १००व्या सामन्यात मेस्सीने दोन गोल करून सर्वाधिक गोल करणाऱ्या ख्रिस्तियानो रोनाल्डोला (७६) मागे टाकले. सामन्यात आक्रमक रणनीती आखत मैदानात उतरलेल्या बार्सिलोनाचे हल्ले म्युनिचचा गोलरक्षक मॅन्युएलने अचूकपणे परतवले. मात्ऱ, मेस्सीच्या चकवा देणाऱ्या खेळासमोर त्याला हतबल व्हावे लागले. पहिल्या डावात सुआरेज (७ मि. व ११ मि.), मेस्सी (३६ मि.) व अ‍ॅल्वेस (३९ मि.) यांचे गोल करण्याचे प्रयत्न मॅन्युएलने हाणून पाडले. मध्यंतरापर्यंत दोन्ही संघ गोलशून्य बरोबरीवर होते. पहिल्या डावातील खेळ पाहता ही लढत बार्सिलोना विरुद्ध मॅन्युएल अशीच दिसत होती.
उत्तरार्धातही असाच सामना रंगला. चेंडूवर जास्तीत जास्त ताबा ठेवत बार्सिलोनाने म्युनिचची बचावफळी भेदली. मात्र, त्यांना गोल करण्यात सातत्याने अपयशच येत होते. ५७व्या मिनिटाला पुन्हा एकदा मेस्सीचा चेंडू मॅन्युएलने अडवला.  मात्र, ७७व्या मिनिटाला अ‍ॅल्वेसने पेनल्टी बॉक्समध्ये उभ्या असलेल्या मेस्सीकडे चेंडू पास केला आणि मेस्सीने तो उजव्या बाजूने गोलजाळीत यशस्वीपणे पोहचवून बार्सिलोनाचे खाते उघडले. या गोलने मॅन्युएल खचला आणि त्याचा फायदा उचलत ८०व्या मिनिटाला मेस्सीने दुसरा गोल नोंदवला. ९०व्या मिनिटाला नेयमारने गोल करून बार्सिलोनाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.

हा निकाल वेदना देणारा आहे. सामन्यावर नियंत्रण मिळवून सर्वोत्तम खेळ करण्याचा आमचा प्रयत्न होता. पूर्वार्धात त्यात यशस्वी ठरलो. मात्र, ०-१ अशा पिछाडीनंतर संघाचे खच्चीकरण झाले आणि सामन्यावरील पकड गमावली.
जोसेफ गॉर्डिओला, बायर्न म्युनिचचे प्रशिक्षक

या विजयाने आम्ही अंतिम फेरीच्या जवळ पोहोचला आहोत. त्यावर दुसऱ्या लीग सामन्यात शिक्कामोर्तब होईल. संघाच्या कामगिरीवर समाधानी आहे आणि तगडय़ा संघाविरुद्ध हा निकाल निश्चितच समाधानकारक आहे.
– लुईस एन्रिक्यू, बार्सिलोनाचे प्रशिक्षक

७७ लिओनेल मेस्सीने चॅम्पियन्स लीगमध्ये सर्वाधिक ७७ गोल करण्याचा विक्रम केला आहे. त्याने ख्रिस्तीयानो रोनाल्डोला (७६) एका गोलने पिछाडीवर टाकले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 8, 2015 12:12 pm

Web Title: lionel messi brilliance leads barcelona to big first leg win over bayern munich
Next Stories
1 मॅन्नी पकिआओविरोधात चाहत्यांची न्यायालयात धाव
2 आशियाई कुस्ती स्पर्धेत गीता फोगटला कांस्य
3 राष्ट्रीय टेनिस स्पर्धा : कीर्तने, गोवेस उपांत्य फेरीत
Just Now!
X