गेली नऊ वर्षे परदेशात अपराजित राहिलेल्या द.आफ्रिकेच्या संघाला धूळ चारून भारतीय संघाने चार सामन्यांची कसोटी मालिका २-० अशी खिशात घातली आहे. नागपूर कसोटीत भारताने आफ्रिकेवर १२४ धावांनी दणदणीत विजय साजरा केला. फिरकीपटू आर.अश्विन हा भारताच्या विजयाचा प्रमुख शिल्पकार ठरला. अश्विनने दोन्ही डावात १२ बळी मिळवले. तर, जडेजा आणि अमित मिश्रानेही साजेशी साथ देत आफ्रिकन फलंदाजांना आपल्या फिरकी जाळ्यात ओढले.

भारताच्या ३१० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना द.आफ्रिकेचा डाव केवळ १८५ धावांत संपुष्टात आला. अश्विनने दुसऱया डावात ६६ धावांत ७ गडी बाद केले. अश्विनची आतापर्यंतच्या कारकिर्दीतील ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. त्याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.

कसोटीच्या तिसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात झटपट बळी गमावल्यानंतर कर्णधार हशिम अमला आणि डू प्लेसिस यांनी मैदानात जम बसवून अर्धशतकी भागीदारी रचल्याने भारतीय संघाची डोके दुखी वाढली होती. अखेर अमित मिश्राने संघाचे पाचवे यश मिळवून देत द.आफ्रिकेचा कर्णधार हशिम अमला(३९) याला चालते केले. त्यानंतर मिश्राने डू प्लेसिसलाचा(३९) त्रिफळा उडवला. अमला- डू प्लेसिस जोडी फोडल्यामुळे भारताच्या विजयाचा मार्ग सुकर झाला.  रबाडा(६), मॉर्केल(३) आणि डी विलास(१२) यांना झटपट बाद करून भारताने विजयावर शिक्कामोर्तब केले.

एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० मालिकेत भारताला द.आफ्रिकेविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे कसोटी मालिकेत भारताची प्रतिष्ठा पणाला लागली होती. पहिल्या कसोटीत दमदार विजय साजरा करत टीम इंडियाने कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या द.आफ्रिकेला धक्का दिला होता. त्यानंतर दुसऱया कसोटीत देखील भारताने पकड घेतली होती. पण, सतत दोन दिवस पावसाच्या हजेरीमुळे दुसरा कसोटी सामना रद्द करावा लागला. त्यानंतर नागपूर कसोटीत जामठाच्या खेळपट्टीवर भारतीय फिरकीपटूंच्या भेदक गोलंदाजीसमोर फलंदाजीचा भरणा असलेल्या आफ्रिकन फलंदाजांनी लोटांगण घातले. भारताचा पहिला डाव २१५ धावांत संपुष्टात आल्यानंतर भारताने द.आफ्रिकेला अवघ्या ७६ धावांत गुंडाळले. त्यानंतर दुसऱया डावात भारताला  १७६ धावांपर्यंत मजल मारता आली आणि १३६ धावांच्या आघाडीसह भारताने आफ्रिकेसमोर ३१० धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान गाठण्यासाठी द.आफ्रिकेकडे तीन दिवसांचा कालावधी होता, पण फिरकीला अनुकूल खेळपट्टी असल्याने सामन्यावर भारताची पकड होती. अखेर भारतीय फिरकीपटूंनी अपेक्षित कामगिरी करत द.आफ्रिकेला १८५ धावांत गुंडाळून विजय प्राप्त केला.